खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक हॅक; बारणेंनी केलं नेटकऱ्यांना आवाहन, म्हणाले पैशांची मदत किंवा....
उरण : सोशल मीडियामुळे जग एकमेकांच्या जवळ येत आहे मात्र असं असताना याचे दुष्परिणाम देखील तितकेच होत आहेत. सोशल मीडिया अकाउंट हॅक करुन ऑनलाईन फसवणूक किंवा कोण्या व्यक्तीच्या फोटोंचा गैरवापर या सायबर गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बारणे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार दिली आहे. या पेजवरून चुकीचा संदेश, पैशांची मागणी झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन बारणे यांनी केले आहे.
एखाद्याचे फेसबुक अकाऊंट, पेज हॅक करून नंतर मित्र परिवाराला पैसे मागण्याच्या घटना अनेकदा घडतात. सुपरीचीत व्यक्तींचे फोटो वापरून त्यांचे बनावाट खाते तयार करण्याचे प्रकार अलिकडच्या काळात सातत्याने समोर येत आहेत. या हॅकींगचा फटका मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना बसला आहे. खासदार बारणे यांचे फेसबुकवर Shrirang Appa Barne या नावाने पेज आहे. हे पेज हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी पेजवरील फोटो डिलीट केले आहेत. काही नवीन फोटो टाकले आहेत. ही बाब लक्षात येताच अज्ञात हॅकर्स विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे असं श्रीरंग बारणे यांनी सांगितले आहे.
याबाबत खासदार बारणे म्हणाले, फेसबुक पेज हॅक झाले आहे. या पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट आल्यास त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करू नका,पैशांची मागणी केल्यास प्रतिसाद देऊ नका, त्याकडे दुर्लक्ष करा, असं बारणे यांनी नेटकऱ्यांना आवाहन केलं आहे.बारणे यांचा फेसबुक हॅक करणारा संबंधित गुन्हेगाराचा चेहरा अद्याप तरी समोर आलेला नसून पोलीस या संदर्भात सखोल तपास करत आहेत. बारणे यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.