वशेणी गावात अनावश्यक प्रथेविरोधात जनजागृती रॅली, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
उरण तालुक्यातील वशेणी गाव सामाजिक बदलांचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी पुढे सरसावले आहे. गावात वाढत्या सामाजिक समस्या आणि काही जुन्या अनावश्यक प्रथा थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन केले. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणाहून सुरुवात झालेल्या या रॅलीत दारूबंदी तसेच ‘हळदीला साडी घेण्याची प्रथा’ बंद करण्याचा ठाम संदेश देण्यात आला.
या रॅलीत गावातील नागरिकांसोबतच महिला मंडळ, युवक मंडळ तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. “दारूबंदी करा – समाज वाचवा”, “अनाठायी प्रथा बंद करा – समाजाला नवा दिशा द्या” अशा प्रभावी घोषणा देत रॅली गावभर फिरली. महिला, तरुण आणि विद्यार्थ्यांचा जोश पाहून गावकऱ्यांमध्ये विशेष ऊर्जा निर्माण झाली.
रॅलीनंतर झालेल्या सभा व भाषणांमध्ये गावातील प्रमुख नागरिक आणि कार्यकर्त्यांनी दारूचे दुष्परिणाम तसेच अनावश्यक प्रथा थांबवल्यास होणारे सामाजिक व आर्थिक फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. दारूमुळे होणारे कुटुंबातील भांडण, आरोग्यावर होणारे परिणाम, तरुण पिढीवर होणारा वाईट परिणाम याबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली. हळदीला साडी घेण्याच्या अनावश्यक प्रथेवर खर्च होणारे पैसे शिक्षण, आरोग्य व विकासासाठी वापरल्यास समाज अधिक प्रगत होईल, असा मुद्दा मांडण्यात आला.
या उपक्रमात गावातील पोलीस पाटील व तालुका पोलीस अधिकारी स्वतः सहभागी झाले होते. त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त करत सांगितले की, दारूबंदी प्रभावीपणे लागू करण्यासाठी पोलिस प्रशासन पुढील काही दिवसांत कडक कारवाई करणार आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गावपातळीवर अशी सकारात्मक चळवळ उभारल्याने वशेणी गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रॅलीमुळे समाजात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, ही ऊर्जा पुढे गावाच्या प्रगतीला हातभार लावेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या रॅलीच्या यशस्वी आयोजनात ग्रामपंचायत सरपंच अनामिका म्हात्रे यांच्यासह सर्व सदस्य सक्रिय सहभागी झाले. त्यांनी गावातील नागरिकांचे कौतुक केले आहे.