राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मुंबईत पावसाचा जोर वाढणार, पुण्यासह सांगली, कोल्हापूरमध्ये तर...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागात पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे. असे असताना आता नवा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रसपाटीवरील मोसमी पाऊस द्रोणिका भटिंडा, पटियाला, देहरादूनमार्गे जात हिमालयाच्या या पायथ्याशी दून असलेल्या अरुणाचल प्रदेशापर्यंत पूर्व-दक्षिणपूर्व दिशेला पसरली आहे.
तसेच, समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर बंगालच्या उपसागराच्या मध्य भागावर चक्री फिरते प्रणाली स्थित आहे. त्याच्या प्रभावाखाली १३ ऑगस्टला बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य व लगतच्या उत्तर-पश्चिम भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून पाऊस पडत असला तरी, यावेळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातही बहुतांश ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, सांगली, कोल्हापूरसाठी अलर्ट जारी
राज्यातील कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्रातील काही भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. ठाण्यासह पुण्यात सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्येही यलो अलर्ट असणार आहे. या काळात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १३ ऑगस्टला चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.