राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित राजापूर सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांकाच्या राज्यस्तरीय ब्ल्यू रिबन २०२३ पुरस्काराने गौरविण्यात आले. मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दमण येथे हा पुरस्कार वितरण सोहळा सन्माननीय मधुकरराव चौधरी (मा. सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते संपन्न झाला.
सन २०२३ मध्ये संस्थेने सभासद, शेअर्स, निधी, गुंतवणूक, ठेव, कर्ज, खेळते भागभांडवल यामध्ये केलेली वाढ, वसुलीचे आदर्श प्रमाण, नेट एनपीए ० टक्के, सातत्याने संस्थेने मिळवलेला ऑडिट ” अ ” वर्ग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना देण्यात आलेल्या आरटीजीएस, एन इ एफ टी, एसएमएस सारख्या सेवासुविधा, मिनी एटीएम, संस्थेच्या शाखा व त्याचे योग्य व्यवस्थापन व संस्थेने जोपासलेली सामाजिक बांधिलकी या सर्व निकषाच्या आधारांवर संस्थेने हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे.
दमण येथे राज्यस्तरीय सहकार परिषद २०२४ चे आयोजन केले होते. त्यामध्ये “बँको ब्लू रिबन पुरस्कार” सन्माननीय मधुकरराव चौधरी (मा. सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संचालक श्री. रमेश सुद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र पाटकर यांनी तो स्वीकारला. यावेळी पाली शाखेचे प्र. शाखाधिकारी श्री. प्रकाश भाबळे, प्रधान कार्यालयातील लिपिक श्री. जितेंद्र मांडवे उपस्थित होते.
या यशाचे श्रेय संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व संस्थेचे चेअरमन सन्मा. प्रकाश मांडवकर साहेब व त्यांना साथ देणारे माजी संचालक मंडळ व विद्यमान संचालक मंडळ, संस्थेचे कर्मचारी वृंद, पिग्मी एजंट, आर डी एजंट , सी ए. एन.एन.पाटणकर, कायदेविषयक सल्लागार एस. एम.देसाई या सर्वांचे मोठे योगदान असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र पाटकर यांनी सांगितले. सलग सहाव्या वर्षी राज्यस्तरीय “बँको ब्लू रिबन पुरस्कार” मिळाल्या बद्दल राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.