फोटो सौजन्य- सोशल मीडिया
छत्तीसगड मधील रायपूर येथे २७ वी अखिल भारतीय वन क्रिडा स्पर्धा २०२४ दिनांक १६ ऑक्टोंबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संपन्न होत आहे. सदर वनक्रिडा स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून २८ राज्यातील खेळाडूं सहभागी झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण १६० खेळाडूं स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर वनवृत्तांतर्गत रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाचे प्रतिनिधीत्व कु. श्रावणी प्रकाश पवार, वनरक्षक व कु. रोहिणी पाटील, वनरक्षक केले असून त्यांनी अॅथलेटिक्स क्रिडा प्रकारात २ सिल्वर व ३ ब्रॉझ पदकांची कमाई केली आहे.
त्यापैकी कु. श्रावणी प्र. पवार यांनी ४०० मी चालणे क्रिडा प्रकारात १ ब्राँझ व हार्डल्स क्रिडा प्रकारात १ ब्राँझ पदक मिळविले आहे. तर कु. रोहिणी पाटील यांनी १५०० मी. व ८०० मी धावण्याच्या क्रिडा प्रकारामध्ये २ सिल्वर पदक व ४४१०० रिले स्पर्धेमध्ये १ ब्राँझ पदकाची मिळविले आहेत.
स्पर्धेत विभागाची सातत्यपूर्ण कामगिरी
मागील वर्षी पंचकुला (हरीयाणा) येथे संपन्न झालेल्या २६ वी अखिल भारतीय वन क्रिडा स्पर्धा २०२३ मध्ये कु. श्रावणी प्र. पवार यांनी ८०० मी. चालणे या अॅथलेटिक्स क्रिडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यामुळे रत्नागिरी वन विभागास पदकांचे यादीत सातत्याने स्थान मिळणून देण्याचे काम केल्याने रत्नागिरी वन विभागाची मान गौरवाने उंचावली आहे.
देशपातळीवर दोन्ही खेळाडूंनी पदके मिळवल्याने रत्नागिरी (चिपळूण) वन विभागाचे शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. असे उद्गार मा. गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांनी काढले आहेत. तसेच श्रीमती प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी कु. श्रावणी पवार, वनरक्षक व कु.रोहिणी पाटील, वनरक्षक यांचेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
याचबरोबर कोल्हापूर वन वृत्ताचे मा.श्री. आर.एम. रामानुजम, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले असून राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणे हे निश्चितच कोल्हापूर वनवृत्तासाठी व आपल्या विभागाची गौरवाची बाब आहे असे म्हणून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.