Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग 'ही' बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय
रत्नागिरी: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या मंदिरांमध्ये ड्रेसकोड सक्तीचा केला गेला आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील श्री देव गणपतीमुळे मंदिर संस्थानाने देखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. गणपतीपुळे मंदिरात भाविकांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. भाविकांसाठी वेशभूषा नियमावली तयार करण्यात आली आहे.
श्री देव गणपतीपुळे संस्थानाने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वेशभूषा व ड्रेसकोड संदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. आता भाविकांना पूर्ण पोषाखच परिधान करून गणपतीपुळे मंदिरात प्रवेश करता येणार आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना ड्रेसकोडचे पालन करण्यासाठी आवाहन केले आहे. समुद्रावर जाण्यासाठी केला जाणारा पोशाख परिधान करून मंदिरात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला आणि तरुणींसाठी गुडघ्यांच्या वर असणारे स्कर्ट्स किंवा शॉर्ट कपडे परिधान करू नयेत, असभ्य भाषा आणि आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे टाळावेत असे आवाहन गणपतीपुळे मंदिर संस्थानाने केले आहे. आक्षेपार्ह भाषा, असभ्य भाषेतील मजकूर असलेले कपडे, तोकड्या कपड्यातील भाविकांना मंदिरात प्रवेश निषिद्ध, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
पिंपरीत ‘या’ मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू
पिंपरी चिंचवड शहरात पाच मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टने यावर भर दिला असून ही मंदिरे केवळ स्थापत्यकलेची स्मारके नाहीत तर श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्माची केंद्रे आहेत. चिंचवड देवस्थान ट्रस्टने त्यांच्या अखत्यारीतील पाच मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा समावेश आहे. मंदिर ट्रस्टने एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
मोरगावचे मोरेश्वर, थेऊरचे चिंतामणी, सिद्धटेकचे सिद्धिविनायक, चिंचवडचे मोरया गोसावी समाधी मंदिर आणि खार नारंगी मंदिर या मंदिरात ड्रेस कोड लागू होईल. ही मंदिरे चिंचवड देवस्थान ट्रस्टद्वारे प्रशासित केली जातात, ज्याने या पवित्र स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलां आहे. सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नेहमी रांगा लागलेल्या असतात. भाविकांना पावणारा गणराया म्हणून सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे. याचपार्श्वभूमीवर ड्रेस कोड संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे.