
Sindhudurg News: ठेकेदाराकडून कमिशन मिळवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी टेंडर काढले नाही; ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा गंभीर आरोप
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्गनगरीसाठी मंजूर झालेल्या सुमारे १२०० कोटी रुपयांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट आताच्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने रोखून धरला आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत यांनी केलेल्या या आरोपामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; अक्कलकोट तालुक्यात शोककळा
‘ठेकेदाराकडून १२ टक्के कमिशन मिळावे यासाठी आताच्या आरोग्यमंत्र्यांनी टेंडर काढलेले नाही’, असा थेट आणि गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला. सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित जाहीर प्रवेश सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नगराध्यक्षपदासह महाविकास आघाडीचे संपूर्ण पॅनल निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. (फोटो सौजन्य – Pinterest)
राऊत यांनी सावंतवाडीतील विकासावर भाष्य करताना म्हटले की, ‘सावंतवाडीच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची केवळ टिमकी वाजवली जात आहे’. तसेच, ‘सावंतवाडीचा विकास काही राजकीय प्रवृत्तींमुळे होऊ शकला नाही’, असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी मटका अड्डयांवर टाकलेल्या धाडींच्या अनुषंगाने बोलताना विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘इथले पालकमंत्री फक्त मटका अड्ड्यावर धाडी मारत आहेत. पण, धाड पडणारे लोकंच म्हणतात की आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत.’ यावेळी त्यांनी गंभीर सवाल उपस्थित करत, ड्रग्सचा व्यापार त्यांना चालतो का?, दारूचे अड्डे त्यांना दिसत नाहीत का?, असे देखील म्हटले.
शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सीमा मठकर यांच्यासह समर्थकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, महिला उपनेते जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाकडे नेण्याची सुरुवात सावंतवाडीतून होत आहे, असे सांगून राऊत यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. ‘सिंधुदुर्ग पोलीस दबावाला बळी पडत नाहीत, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. प्रामाणिक लोकांना दडपण्याचे प्रकार होतील, मात्र शिवसेना तिथे उभी राहील’, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सभेत माजी आमदार जयानंद मठकर यांच्या सूनबाई सीमा मठकर यांचा त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. विनायक राऊत म्हणाले, ‘जयानंद मठकर यांना अनेकांनी गुरू मानले. फसवणाऱ्यांच्या विरोधात मठकर कुटुंबाला मान देणाऱ्या भगव्याचा अभिमान माजी आमदार मठकर यांना स्वर्गात नक्कीच वाटत असेल.’