
निवासी डॉक्टरांचा संप उद्यापासून
नागपूर : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच सेंट्रल मार्डने राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे. मार्डने या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि इतर मागण्यांसाठी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. आता ३ नोव्हेंबरपासून संपाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांचे दुखणे आणखी वाढणार आहे हे निश्चित आहे.
संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र सादर केले आहे, ज्यात विविध मागण्या आहेत. ज्यात जलद न्यायालयीन प्रक्रिया, निष्काळजी अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे, डॉक्टरांच्या संरक्षणासाठी पद्धतशीर सुधारणा, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य आणि प्रतिष्ठा राखणे, शोकग्रस्त कुटुंबाला किमान २५ कोटी रुपयांची भरपाई देणे आणि पात्र कुटुंबातील सदस्याला नोकरी देणे समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
हेदेखील वाचा : Satara Doctor Death Case: “महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा..; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन आव्हाडांचा चढला पारा
एसआयटी स्थापनेचा अधिकृत आदेश लवकरच जारी होण्याची अपेक्षा आहे. सेंट्रल मार्डचे सरचिटणीस डॉ. सुयश धवन यांनी सांगितले की, संघटनेला या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. जर सरकारकडून लेखी आश्वासन मिळाले तर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल.
राजकीय वातावरणही तापलं
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या आत्महत्येप्रकरणानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.