डॉ. संपदा मुंडे फलटण आत्महत्या प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली (फोटो सौजन्य - एक्स)
Satara Doctor Death Case: फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन टीका केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन फलटण डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सत्त्ताधारी आणि व्यवस्थेच्या कारभारावर ताशेरे ओढत ही आत्महत्या नसून ही संस्थात्मक हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहे जितेंद्र आव्हाड?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, स्व डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती कर्तबगार लेक म्हणजे स्व.डॉ.संपदा मुंडे.! चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉ.संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होते.
स्व डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे..
एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती कर्तबगार लेक म्हणजे स्व.डॉ.संपदा मुंडे.!
चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस… pic.twitter.com/s0sxffq13Y — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 26, 2025
ती अनेक महिन्यापासून या प्रशासनातल्या असूरी शक्ती विरुद्ध नियतीचा लढा एकटी लढत होती.! पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ- कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे. आज आवाज नाही उठवला तर ही जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा करतील, अशी गंभीर टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
Satara Doctor Case फलटण प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
खासदार राहुल गांधींची प्रतिक्रिया
साताऱ्यातील या आत्महत्या प्रकरणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील सातारा येथे लैंगिक छळ आणि बलात्कार झाल्यानंतर एका महिला डॉक्टरची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका आहे. इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणारा एक आशादायक डॉक्टर भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाला बळी पडला. गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीने या निष्पाप महिलेवर सर्वात घृणास्पद गुन्हा केला. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे शोषण केले. वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनीही तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या संरक्षणाखालील गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या आहे.” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.






