ई-महाभूमीच्या माध्यमातून शासन झाले 'मालामाल'; अभिलेखातून 76.80 कोटींचा महसूल प्राप्त
पुणे : तलाठी, तहसीलदार कार्यालयाचे खेटे मारण्यापेक्षा ई-महाभूमीच्या माध्यमातून सरत्या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी व नागरिकांनी तब्बल 4 कोटी 35 लाख ऑनलाईन अभिलेख डाऊनलोड केले आहेत. यातून सुमारे 76 कोटी 80 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. हे उत्पन्न पाहता राज्यातील शेतकरी हायटेक झाल्याचे दिसून तर येत आहे. त्याचबरोबर राज्याच्या महसूल विभागात डिजिटल क्रांती झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शेती संबंधित कागदपत्रे उदारणार्थ सातबारा, फेरफार, नकाशे आदी दस्त घरबसल्या संगणकाच्या माध्यमातून शेतकरी व इतर नागरिकांना विहित शुल्क भरून डाऊनलोड करून घेता येऊ लागले आहेत. परिणामी, महसूल विभागाच्या विविध कार्यालयावरील ताण व नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. त्यातच नागरिकांचा व शेतकऱ्यांचा वेळ व हेलपाटेही वाचले आहेत. महसूल विभागातील या डिजिटल क्रांतीमुळे सरत्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या एका वर्षात शेतीशी संबंधित तब्बल 4 कोटी 35 लाख अभिलेख घरबसल्या डाऊनलोड झाले आहेत.
दरम्यान, यातून महसूल खात्याला नक्कल शुल्काच्यापोटी तब्बल 76 कोटी 80 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही आकडेवारी राज्यातील ई-महाभूमी प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सरत्या आर्थिक वर्षात 3 कोटी 3 लाख 77 हजार 875 सातबारा उतारे, ९६ लाख ५६ हजार ५२६ खाते उतारे ( ८अ), २० लाख ३१ हजार ५२२ फेरफार नोंदीचे उतारे आणि १५ लाख २१ हजार ७९२ मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) शेतकर्यांनी डाऊनलोड केले आहेत.