'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन
मुंबई : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरत आहे. मात्र, यामध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या फेरपडताळणीवरून राज्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही फेरपडताळणी सुरू असली तरी पात्र लाभार्थी महिलांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
अदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सरकारला मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरुपाचा आहे. या योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यावेळी या योजनेंतर्गत २ कोटी ६३ लाख लाख महिलांची नोंदणी झाली होती. प्राथमिक पडताळणीत १० ते १५ लाख अर्जदार अपात्र ठरले होते. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विभागांकडून त्यांच्याकडील लाभार्थ्यांची माहिती मागवली. माहिती तंत्रज्ञान विभागाने आम्हाला सर्व विभागाच्या २६ लाख लाभार्थीची माहिती दिली. त्यात काही लाभार्थी महिलांना अन्य योजनांचा लाभ मिळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, काही महिला पहिल्याच पडताळणीत बाद ठरल्या.
अंगणवाडी सेविकांचा पडताळणीस नकार
अंगणवाडी सेविकांनी गावातील संबंध बिघडण्याच्या भीतीने पडताळणीचे काम करण्यास असमर्थता दर्शवल्याविषयी प्रश्न केला. त्यावर अदिती तटकरे म्हणाल्या, सरकार प्रस्तुत महिला गरजू महिलांसाठी राबवत आहे. शासकीय सेवेत असतानाही या योजनेचा लाभ घेतला जात असेल तर शासन त्याविषयी योग्य तो निर्णय घेईल. या प्रकरणी कुणालाही चुकीचा लाभ मिळू नये यासाठी सरकार योग्य ती पाऊले उचलत आहे. त्यामुळे सर्वांनी अंगणवाडी सेविकांना पडताळणीसाठी सहकार्य करावे.
चुकीच्या पद्धतीने कुणालाही लाभ मिळता कामा नये
सरकार जनतेला वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ एखादी महिला घेत असेल तर तिला अपात्र ठरवले असेल, तर कदाचित त्या महिला दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अधिकच्या उत्पन्नामुळे ती निकषात बसत नसेल, पण चुकीच्या पद्धतीने कुणालाही या योजनेचा लाभ मिळता कामा नये, असे तटकरे यांनी या प्रकरणी स्पष्ट केले.