
शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भुयेवाडी (ता.करवीर) येथे सव्वा सहा लाखांचा दरोडा पडला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री साडेदहा ते पावणे तीनच्या दरम्यान या दोन्ही गावात धुमाकूळ घातला आहे. तोंडाला रुमाल बांधून, अंगात शर्ट न घालता केवळ हाफ पँटवर हातात धारधार शस्त्रे घेऊन हे चोरटे भुये व भुयेवाडी फिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत भुये येथील नायकू पांडूरंग निरुखे यांच्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात, तर भुयेवाडी येथील प्रिया अजित पाटील यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, भुये येथील नायकू निरुखे हे झोपले होते. रात्री साडेदहा ते पावणे तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी काढून घरामध्ये प्रवेश केला. घरातील तिजोरीचा दरवाजा चावीने उघडला व तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पाच लाख एकोणचाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला.
यामध्ये वेल, झुमके, नेकलेस, तीन अंगठ्या, गंटण, चेन, रिंगा, टॉप्स, लक्ष्मीहार हे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण व रोख 58 हजार रुपये असा मुद्देमाल चोरला व तिजोरीतील साहित्य विस्कटले. तर भुयेवाडी येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमाराला तीन अज्ञात चोरट्यांनी घराच्या पत्रा शेड जवळील रिकाम्या जागेतून घरामध्ये प्रवेश केला. या आवाजाने अजित पाटील व त्यांच्या पत्नी प्रिया दोघेही जागे झाले. पण चोरट्यांनी अजित पाटील व प्रिया पाटील यांना मारहाण करण्याची धमकी दिली व प्रिया यांच्या गळ्यातील सुमारे पावणे दोन तोळ्याचे सोन्याचे अंदाजे 81 हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याबाबत प्रिया पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चोरटे परप्रांतीय, फासेपारधी असल्याचा ग्रामस्थांचा संशय
हे चोरटे परप्रांतीय किंवा फासेपारधी असल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. ते धारधार शस्त्रे घेऊन वावरत असल्याने ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण आहे.