Rohini Khadse appears as lawyer at Pranjal Khewalkar's hearing in Pune court
पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या चर्चेमध्ये आल्या आहेत. रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये रंगेहात पकडण्यात आले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. यामुळे जोरदार वाद देखील निर्माण झाला आहे. एकनाथ खडसे यांच्याकडून हे षडयंत्र असून ही रेव्ह पार्टी नसल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. पतीला वाचवण्यासाठी पत्नी रोहिणी खडसे या वकिली कोट घालून कोर्टामध्ये दाखल झाल्या आहेत.
शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे या पुणे न्यायालयामध्ये दाखल झाल्या आहेत. कथित रेव्ह पार्टीमुळे वाद तापला आहे. ही रेव्ह पार्टी नसून घरगुती पार्टी असल्याचा दावा खडसेंकडून केला जातो आहे. खराडी येथील या रेव्ह पार्टीमध्ये अटक करणाऱ्यांमध्ये प्रांजल खेवलकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी आता समाप्त झाली असून या सर्व आरोपींना पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. यावेळी रोहिणी खडसे या वकिली कोट घालून न्यायालयामध्ये दाखल झाल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत. त्यामुळे रोहिणी खडसे आज न्यायालयात हजर होत्या. राजकारणामध्ये सक्रीय असलेल्या रोहिणी खडसे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्या स्वतः एक वकील आहेत. त्यामुळे आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यादेखील प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून दिसल्या. त्यामुळे आता नेमके काय होणार? प्रांजल खेवलकर तसेच इतर आरोपींची सुटका होणार का? याबाबत सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत.
सुनावणीनंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनावणीनंतर न्यायालयातून बाहेर आल्यानंतर रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यमांनी केसबाबत विचारताच रोहिणी खडसे म्हणाल्या की, ‘हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे. यावर योग्य वेळी मी माझी संपूर्ण भूमिका मांडणार आहे.’ असे विधान रोहिणी खडसे यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ खडसे यांना रेव्ह पार्टीबाबत संशय
एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांच्या जावयाला केलेल्या अटकेवर संशय व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, “पोलिसांच्या कारभाराविषयी माझ्या मनात काही प्रश्न आहेत. जे माध्यमांमधून मला उपस्थित करायचे आहेत. तिथे पाच-सात जणांची पार्टी चालू होती. तिथं कुठलंही संगीत नाही, नृत्य नाही, कुठलाही गोंधळ नाही. एका घरात पाच-सात जण पार्टी करत होते, त्याला तुम्ही रेव्ह पार्टी कसं काय म्हणता? असं असेल तर देशात, राज्यात कुठेही पाच-सात जण मिळून पार्टी करत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणार का? रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय ती पोलिसांनी स्पष्ट करावी. त्यामुळे रेव्ह पार्टी आयोजित केली म्हणून माझ्या जावयाची बदनामी करण्याचं प्रयोजन काय?” अशी प्रश्नांची सरबत्ती एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली.