RSS Completes 100 Years: Mohan Bhagwat’s Speech at Reshimbagh, Nagpur
RSS100Years : नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज त्यांची 100 वी जयंती साजरी करत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संघ स्वयंसेवक आणि भाजप पक्षाकडून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागपुरा तील रेशमबाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. संघशताब्दी निमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, ट्ररिफ वॉर आणि शेजारील देशांवरील परिस्थिती त्याचबरोबर देशातील हिंदू बांधव अशा सर्वच मुद्द्यांवर मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे.
संघशताब्दीनिमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबागमधून संपूर्ण विश्वातील स्वयंसेवकांना संबोधित केले. यावेळी मोहन भागवत यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. भागवत म्हणाले की “काही महिन्यांपूर्वी पहलगामसारखी दुर्घटना झाली. धर्म विचारून निष्पाप लोकांची हत्या झाली. या घटनेनंतर सेना आणि सरकारने ठामपणे उत्तर दिले. ज्यामुळे नेतृत्वाची दृढता दिसून आली. आपण सर्वांशी मैत्री ठेवावी, पण आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला समर्थ आणि सजग राहणे आवश्यक आहे”, असे मोहन भागवत म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदू संस्कृती आणि हिंदू बांधवांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. आपली संस्कृती सगळ्यांचा सन्मान व स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचं जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्या हिंदू समाजाने केलं आहे, त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीही म्हटलं जातं. भारतात या संस्कृतीला आवश्यक समृद्ध व सुरक्षित वातावरण मिळाले. पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी आपल्या पूर्वजानी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे. त्या संस्कृतीचे आचरण, आपल्या पूर्वजांचा गौरव, विवेकपूर्ण आचरण व आपल्या मातृभूमीची भक्ती हे सगळे मिळू आपले राष्ट्रीयत्व तयार होतं, अशा भावना आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शताब्दीवर्षानिमित्त व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरसंघचालक पुढे म्हणाले, “सर्व विविधतेला एकत्र ठेवणारी आपली संस्कृती हीच आपली राष्ट्रीयता आहे. हीच आपली हिंदू राष्ट्रीयता आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप आहे, त्यांनी हिंदवी म्हणावं, भारतीय म्हणावं. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पण या राष्ट्रीयतेचं स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे हिंदू आपले राष्ट्र राज्यावर आधारित नव्हतंच कधी. आपलं आपल्या पवित्र मातृभूमीवरील प्रेम, भक्ती एकत्रितपणे आपले राष्ट्रप्रेम निर्माण करते. आदराने सर्वांना एकत्र आणणारे हे हिंदू राष्ट्रप्रेम आपल्याला नेहमीच एकसंध ठेवत आले आहे. आपल्याकडे ‘राष्ट्रराज्य (नेशन-स्टेट) ही संकल्पना नाही. राज्ये येतात आणि जातात, पण राष्ट्र कायम टिकते. आपण आपल्या एकतेचा हा पाया कधीही विसरता कामा नये, असे देखील मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.