विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोधक आक्रमक
मुंबई : राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. काल वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आज सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर प्रश्नोत्तर होणार आहे. त्यामुळे सभागृहामध्ये विरोधक व सत्ताधारी आमने सामने येणार आहेतच. मात्र त्यापूर्वीच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर महायुती व महाविकास आघाडी एकमेकांसमोर आल्या आहेत. विधीमंडळांच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी आंदोलन केले. सत्ताधाऱ्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे पोस्टर धरले. यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सत्ताधाऱ्यांचा ठाकरे गटावर निशाणा
महायुतीच्या सत्ताधारी लोकांनी देखील विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी महायुतीने ठाकरे गट व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचे पोस्टर घेत पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार घोषमा केली. या पोस्टवर ठाकरे गटाचे व्यंगचित्र काढण्यात आले होते. ‘एक आघाडी बारा भानगडी’ व गाव बसा नहीं लूटरे आ गए असा आशय त्यावर लिहिण्यात आला आहे. मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेली रस्सीखेच यामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यावर आदित्य ठाकरे, संजय राऊत व नाना पटोले अशा नेत्यांची चित्रे दाखवण्यात आली आहे. यावेळी सत्ताधारी नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
विरोधकांकडून सडेतोड उत्तर
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी देखील आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसह व आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. हातामध्ये फलक घेत विरोधकांनी आंदोलन केले. तसेच आंदोलनावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती हातात घेतली होती. त्यावेळी विरोधकांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरुन जहरी टीका केली. भाऊ म्हणून दाखवतयं महिलांना योजनाचं भूल, महिलाच करतील यांना निवडणुकीत गुल आणि लोकसभेचा धसका आणि विधानसभेसाठी मस्का अशी पोस्टरबाजी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, रवींद्र धंगेकर, अनिल देशमुख असे विरोधातील आमदार उपस्थित आहेत.