कोपरगाव : अनेक खेळाडूंना घडविणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेऊन भारतीय नेव्हीमध्ये कार्यरत असलेला माजी विद्यार्थी सैफ सादिक तांबोळी याची इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी जिम्नास्टिक या प्रकारात भारतीय संघात निवड झाली.
सैफ नुकताच इंग्लंडला रवाना झाला आहे. त्याबद्ल संस्थेचे अशोक काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, विश्वस्त आशुतोष काळे, सचिव चैताली काळे तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांनी तसेच प्राचार्य नूर शेख व सर्व सहकारी शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
इंग्लंड देशातील बर्लिन्गम येथे २८ जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेस प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या खेळाडूंचा समावेश असून, जिम्नॅस्टिक या प्रकारात भारताच्या संघात मनमाडच्या सैफ तांबोळीची निवड करण्यात आली आहे. सैफ तांबोळी हा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी असून, तो नाशिक जिल्ह्यातील मनमाडचा रहिवासी आहे.
खेळाडू घडविणारे शैक्षणिक संकुल अशी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये सैफ तांबोळी याने आपले प्राथमिक एचएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच जिम्नास्टिकची आवड असलेल्या सैफला गौतम पब्लिकच्या स्कूलच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिकत असताना विभाग, राज्य, आंतरराज्य त्यानंतर देशपातळीवर जिम्नास्टिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानमुळे त्याला भारतीय नेव्हीमध्ये नोकरी मिळाली. नोकरी करत असताना त्याने आपला सराव पुढे सुरूच ठेवला. त्याचे फळ म्हणून आज तो कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सैफ नक्कीच पदक पटकवणार असा त्याच्या प्रशिक्षकांना विश्वास आहे.