संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, रात्री घरी परतत असताना दुर्घटना; महापालिका राबवणार भटके कुत्र्यांना पकडण्याची मोहीम
Sambhaji Bhide News in Marathi : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर महानगरपालिकेला जाग आली.सांगली शहरातील कुत्री पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.
सांगलीतील शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सोमवारी रात्री कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायावर चावा घेतला. शहरातील माळी गल्लीत हा प्रकार घडला होता. त्यानंतर शासकीय रुग्णालयात संभीजी भिडे गुरुजींवर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर महापालिक प्रशासनाकडून शहारतल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिका प्रशासन मोहीम राबत आहे. या घटनेनंतर सांगली महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. शहरातील विविध भागात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला पाठिंबा दिला होता. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरुन वाघ्या कुत्र्याचे स्मारक काढण्याची मागणी केली होती.
संभाजी भिडे यांचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक त्यांना मानतात. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शिकवायला सुरुवात केली. त्यांचे सर्व पक्षांतील राजकारण्यांशी संबंध होते. पण ते राजकारणात आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी भिडे यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडेंना गुरुजी म्हणतात. उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजी भिडे यांच्याशी चांगले संबंध होते. दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम आणि राष्ट्रवादी नेते आर.आर. पाटील हे त्यांच्याशी जवळचे नाते राहिले आहे.