केंदूरमध्ये जमिनीच्या वादातून बहिणींसह वडिलांना मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल (फोटो सौजन्य- PINTEREST)
शिक्रापूर : केंदूर (ता.शिरुर) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका सख्ख्या बहिणीसह वडिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. यामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फक्कड ठकाराम साकोरे, रवींद्र फक्कड सामोरे, राजेंद्र फक्कड साकोरे, सुलोचना फक्कड साकोरे, संभाजी सुदाम साकोरे, ललिता संभाजी साकोरे या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंदूर (ता.शिरुर) येथे छबुबाई आदक यांच्या वडिलांची वडिलोपार्जित शेतजमीन असून, सदर जमिनीचे वाटप झालेले नसल्याने छबुबाई त्यांच्या बहिणींसह वडिलांकडे जमिनीच्या वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा भाऊ फक्कड साकोरेसह त्याच्या मुलाने वाद घालत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यामुळे सर्वजण पुन्हा घरी गेले. त्यानंतर सोमवारी (दि.14) पुन्हा छबुबाई आदक त्यांच्या बहिणी शकुंतला ननवरे, अंजनाबाई तांबे, भाऊ पांडुरंग साकोरे, मुलगा स्वप्नील आदक हे वडिलांच्या घरी माहेरी जाऊन भाऊ फक्कड याला बोलावून घेतले.
‘आम्हाला त्या दिवशी शिवीगाळ का केली?’ याबाबत विचारणा केली असता फक्कड साकोरे, भाचा रवींद्र साकोरे, राजेंद्र साकोरे, सुलोचना साकोरे, संभाजी साकोरे, ललिता साकोरे यांनी सर्वांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करत जखमी केले.
याबाबत छबुबाई साहेबराव आदक (वय 52, रा. कान्हुर मेसाई ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी फक्कड ठकाराम साकोरे, रवींद्र फक्कड सामोरे, राजेंद्र फक्कड साकोरे, सुलोचना फक्कड साकोरे, संभाजी सुदाम साकोरे, ललिता संभाजी साकोरे (सर्व रा. महादेववाडी केंदूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.