
‘माझी वसुंधरा’त सांगली जिल्हा परिषदेची सलग तिसऱ्यांदा राज्यात बाजी; पर्यावरणपूरक वाटचाल पुन्हा अधोरेखित
सांगली : पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि लोकसहभागाच्या बळावर राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली पर्यावरणपूरक वाटचाल अधोरेखित केली आहे. जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींनी विविध लोकसंख्या गटांत उल्लेखनीय कामगिरी नोंदवत सुमारे साडेदहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २०२० पासून सुरू असलेल्या या अभियानांतर्गत स्वच्छता, जलसंधारण, ऊर्जा बचत, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर आधारित गुणांकन केले जाते. सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून उपक्रम राबवत पर्यावरण संरक्षणाची प्रभावी चळवळ उभी केली आहे.
विविध लोकसंख्या गटांत उल्लेखनीय यश
– १ हजार लोकसंख्या गटात पिंपळवाडी ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. १ ते दीड हजार लोकसंख्या गटात अलकूड (एम) ग्रामपंचायतीने विभागस्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला. २ ते ३ हजार लोकसंख्या गटात नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर लंगरपेठ ग्रामपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला.
– ३ ते ५ हजार लोकसंख्या गटात आळसंद (ता. खानापूर) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला, तर वाळेखिंडी (ता. जत) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकाविला. याच गटात धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीला विभागस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला.
– ५ ते १० हजार लोकसंख्या गटात येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. याच ग्रामपंचायतीने ‘भूमी’ या थिमेटिक प्रकारातही राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. मिरज तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायतीने विभागस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला.
– १० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात वाळवा तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय, तर कासेगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला. विभागस्तरावर पेठ ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
पंचायत समित्यांचीही दमदार कामगिरी
अभियानात तासगाव पंचायत समितीने राज्यात प्रथम, मिरज पंचायत समितीने द्वितीय, तर कवठेमहांकाळ पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकाविला. विभागस्तरावर खानापूर-विटा, पलूस व कडेगाव पंचायत समित्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. जिल्हा परिषद स्तरावर कडेगाव पंचायत समिती विशेष ठरली.
नेतृत्वामुळे अभियानाला गती
अभियानाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर विशाल नरवाडे यांनी अभियानाला अधिक गती देत जिल्ह्यातील गावांच्या कामगिरीला बळ दिले.
हेदेखील वाचा : Shivjayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा; सकाळी साडेसात वाजता होणार सुरुवात
राज्यस्तरीय कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांचा मुंबई येथे शनिवारी (दि.२१) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
विशाल नरवाडे राज्यात सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी
अभियानातील उत्कृष्ट अंमलबजावणी आणि परिणामकारक समन्वयाबद्दल विशाल नरवाडे यांची राज्यातील सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
सांगली जिल्हा परिषद सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम
“लोकसहभाग, सुयोग्य नियोजन आणि पर्यावरणाबाबतची ठाम बांधिलकी यामुळे सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यात मोलाचे योगदान आहे.”
– शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जि. प. सांगली