सौजन्य- सोशल मिडीया
मुंबई : विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांना कसं गुपचूप भेटायचो याचा उलगडा केला होता. नाव आणि वेश बदलून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी आपण १० वेळा दिल्लीत गेलो, असेही त्यांनी सांगितले होते. अजित पवारांच्या या खुलाशावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साधला आहे.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे वेशांतर करून विमानतळावर जातात त्यांना कुणी रोखत नाही. याचा अर्थ त्यांनी नाव बदलून, बनावट पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड ओळखपत्रे बनवली आहेत.ओळपत्राशिवाय विमानतळावर कोणीही सोडत नाही. या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासोबत त्यांनी जी बनावट ओळखपत्रे वापरून प्रवास केला ती सर्व जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांची चौकशी झाली पाहिजे. यातून अतिरेकी आणि दहशतवाद्यांनाच प्रेरणा दिली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री तर मौलवीच्या वेशात गृहमंत्री अमित शांहांना भेटले, अशी माहिती माझ्याकडे आहे. एकनाथ शिंदे वेगवेगळ्या विमानतळावरून जेव्हा-जेव्हा दिल्लीला गेले, तेव्हा-तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते. त्यांना दाढी आहेच. नाव बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीला गेल्याची माझ्याकडे माहिती माझ्याकडे आली आहे. त्यांना मौलवीचा वेश शोभतो, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
कोणताही माणूस वेश पालटून मुंबई- दिल्ली सारख्या राष्ट्रीय विमानतळात घुसतो आणि त्याच वेशात देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो. हयाचा अर्थ हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ झाला आहे. यात राज्याचे आणि देशाचेही गृहमंत्री सामील आहेत. यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन अतिरेकी, दहशवादीही नाव बदलून येऊ शकतात. दाऊद इब्राहिम कितीवेळा असा वेश बदलून यांच्या काळात आला असेल माहिती नाही.
दरम्यान, दोनदिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सामील होताना केलेल्या वेशांतराबाबत खुलासे केले होते. सत्तानाट्यावेळी अमित शाह यांच्यासोबत 10 बैठका झाल्या होत्या. दिल्लीत त्यांच्या या बैठकांना जाण्यासाठी सामान्य विमानाने प्रवास करायचा होता. त्यावेळी आपण मास्क आणि टोपी घालून त्यांचा मुंबई-दिल्ली- मुंबई असा प्रवास करावा लागायचा. हा प्रवास करताना आपण अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ते A. A. Pawar अशा नावाने प्रवास करायचो. याच नावाने बोर्डिंग पास तयार व्हायचा. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अशाच पद्धतीने वेशांतर करून अमित शाहांसोबत जवळपास 10 बैठका केल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते.