
मलकापुरात आणखी एक जागा पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना; , दुसऱ्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत लढत
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले असले तरी महायुतीत चढओड सुरु आहे. रविवारी महायुतीचे जागा वाटप निश्चित होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
जागा वाटपांचे चर्चेचे गुऱ्हाळ महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सुरु आहे. अजित पवार यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीची ‘गाडी’ रुळावर परतली. त्यानंतर जागा वाटपाचे सुत्र निश्चित केले गेले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना जागा वाटपात कोणतीही अडचण नाही. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेची मनसेसोबत युती झाली आहे. पुण्यात मनसेला महाविकास आघाडीत घेतले जाणार का ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची जागा वाटपासंदर्भात बैठक सुरु आहे. या बैठकीत महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या पन्नास जागांपैकी किती जागा मनसेला दिल्या जाणार हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. महाविकास आघाडीने पंधरा जागा या मित्र पक्षांसाठी ठेवल्या आहेत. त्यापैकी काही जागा मनसेला दिल्या जाणार का ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महायुतीत जागावाटपासाठी चढाओढ
महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झाले नाही. शिंदेंच्या शिवसेनेकडून पंचवीस पेक्षा कमी जागा घेतल्या जाणार नाही, अशी भूमिका घेतली गेली आहे. तर भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला पंधरा जागांचा प्रस्ताव दिला आहे. याविषयावर शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. पक्षाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आमची चर्चा सुरु असून, पंचवीस जागा आम्हाला हव्यात अशी भुमिका असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.
आज महायुतीचे चित्र स्पष्ट होणार?
महापालिका निवडणुकीत आम्हाला भाजपकडून सन्मानजक जागा मिळत नसल्याचा आरोप शिंदे शिवसेनेकडून केला जात आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मोहोळ यांना विचारले असता, ते म्हणाले ‘‘जागा वाटपासंदर्भात आमच्या चर्चा सुरु आहे. प्रस्ताव आम्ही एकमेकांना देत आहोत, त्या प्रस्तावावर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी त्यांच्या पातळीवर चर्चा करत आहेत. काही जागांच्या बाबतीत आमचे एकमत झाले आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?