पुणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पंतप्रधान देशातील १४० कोटी लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम करत आहेत. खासदार संजय राऊत आता काँग्रेसमय झाले असून, त्यांनी काँग्रेसचे संविधान स्वीकारले आहे. त्यामुळे ते काँग्रेसची भाषा बोलतात. संजय राऊतांना टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही येत नाही. असे सांगून, भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, राऊत यांचे बोलणे हे सामाजिक स्वास्थ्य खराब करणारे असल्याचा आरोप केला.
हास्य योग्य संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या लोकांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकचा विरोध करून, अशा लोकांना पाठिंबा दिला की ज्यांना आनंद होतो. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे व संजय राऊत बोलत आहे ते पाहता, त्यांना व त्यांच्या पिलावळांना नरेंद्र मोदी अजून समजतच नाहीत, ते समजायला वेळ लागेल. नरेंद्र मोदी कोणालाही धक्का न लागू देता पाकिस्तानचा आणि दहशतवाद्यांचा बिमोड करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Ahmednagar Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुरूंग? बड्या नेत्याने घेतली राम शिंदेंची भेट
माजी मुख्यमंत्री सत्कार कार्यक्रमात एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे त्या कार्यक्रमाला गेले नाहीत कदाचित त्यांना इतर महत्त्वाचं संघटनात्मक कार्य असेल. किंवा त्यांच्याकडे एवढी चार-पाच महत्वाची खाती आहे, त्यातील काही महत्त्वाचं काम असेल त्यामुळे ते जाऊ शकले नसतील. महायुतीचे सरकार हे प्रचंड मजबूत आहे, कुठेही बेबनाव नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार तिघेही भावासारखे काम करतात याचा मी साक्षीदार आहे. या सरकार मध्ये बेबनाव असल्याचे चित्र तयार करून, महाराष्ट्रात विचित्र वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काहीं कडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
आमच्या पक्षांमध्ये सामूहिक निर्णय होतात. विकसित महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे जनप्रिय लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. अजित पवारांना व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचंय असेल तर आपापला पक्ष वाढवण्याची त्यांना मुभा आहे. आम्ही सरकार म्हणून तिघे एकत्र आहोत. ही पक्ष संघटनेची भावना आहे, भावना व्यक्त करायला काय हरकत आहे . प्रत्येकाला पक्ष वाढवण्यासाठी काही भूमिका मांडाव्या लागतात, त्या मांडल्या तर त्यात काय हरकत आहे असेही त्यांनी मत व्यक्त केले.
पुरंदर विमानतळ विकास करत असताना काही जमिनी संपादित कराव्या लागत आहेत. पुरंदर विमानतळ हे इंटरनॅशनल पुणे बनवण्याचा एक महत्त्वाचे स्थान आहे. पुरंदर विमानतळाचं डिझाईन तुम्ही बघाल, तर सर्वसामान्य नागरिक ही म्हणेल हे विमानतळ झालेच पाहिजे.
यामध्ये जमीन संपादित करताना शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, तर त्यांनी माझ्याजवळ, मुख्यमंत्र्यांजवळ किंवा अजित पवारांसमोर मांडावे. ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, गरज पडली तर मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेतली जाईल. जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांवर लाठी चार्ज होणे, त्यांचा जीव जाणे हे मान्य नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले मला माहिती नाही, मला माहिती घ्यावी लागेल. आमची खाती वेगवेगळी असली तरी, जेव्हा सामूहिक निर्णय होतो तेव्हा ते निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात. लाडकी बहीण योजनेचे म्हणायचं झालं तर एखादी योजना जेव्हा आपण राज्य म्हणून चालू करतो, तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते. मी याबाबत संजय शिरसाठ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.