Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2025 rain update in aalndi pune
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 : पुणे : राज्यामध्ये आषाढी वारीला सुरुवात झाली आहे आज (दि.19) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यामुळे आळंदी सजली असून वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये आणि राम कृष्ण माऊलीच्या गजराने अलंकापूरीमध्ये प्रसन्नमय वातावरण निर्माण झाले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. वारकऱ्यांचा मेळा आळंदीमध्ये जमा झाला असून आषाढी वारीचा मोठा उत्साह वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व ट्रस्टकडून पालखी प्रस्थान सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच दर्शनासाठी स्वतंत्र दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये प्रशासन व पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्ही देखील लावण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान हे रात्री आठ वाजता होणार आहे.
वारकरी सांप्रदायासाठी इंद्रायणी नदीचे विशेष महत्त्व आहे. त्यापूर्वी वारीच्या निमित्ताने आलेले वारकरी हे इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी लगबग करत असतात. मात्र सध्या पुण्यामध्ये तुफान पाऊस होत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी दुधडी भरुन वाहत आहे. यामुळे वारकऱ्यांनी नदीमध्ये किंवा नदीकिनारी न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नदी किनारी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वारकऱ्यांनी नदीच्या तिरावर आणि घाटांवर प्रवेश करु नये म्हणून रस्सी लावण्यात आली आहे. नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यामुळे इंद्रायणी नदीमध्ये वारकऱ्यांनी उतरु नये असे आवाहन केले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला वरूणराजाने देखील उपस्थिती लावली आहे. पुण्यामध्ये सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड व आळंदी भागामध्ये देखील मोठा पाऊस कोसळत आहे. यामुळे पालखी मार्गावर देखील पाणी साचले आहे. मात्र भर पावसामध्ये देखील वारकऱ्यांचा अखंड हरिनाम जप आणि वारी सुरु आहे. जोरदार पाऊस सुरु असताना देखील दिंड्या या आळंदीमध्ये दाखल होत आहे. पालखी मार्गावर गुडघाभर पाणी साचलेले असताना वारकरी हे पायी चालत आहेत. यावेळी वारकऱ्यांनी शेतीसाठी जोरदार आणि चांगला पाऊस होऊ दे हेच मागणे पांडुरंगाच्या चरणी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे शहरात पालखीचे आगमन येत्या गुरुवारी (दि.20) होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जून रोजी दोन्ही पालख्यांचे पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे. यावेळी हजारो वारकरी हे शहरामध्ये दाखल होत असतात. या सर्व वारकऱ्यांच्या निवासाची तयारी पूर्ण झाली आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाचा जोर लक्षात घेता निवासाची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र निवासस्थाने तसेच त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. याचबरोबर स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने निर्जंतुकीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडुंग्या विठोबा मंदिराचे विश्वस्त आनंद पाध्ये यांनी दिली. शहरातील शाळा, महाविद्यालये, मंदिर परिसर, सार्वजनिक सभागृहे, तसेच सामाजिक संस्था यामध्ये वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.