शिवसेनेचा वर्धापन दिन असून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे वेगवेगळे वर्धापन मेळावा होणार आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Shivsena vardhapan din 2025 : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर पालिका आणि जिल्हापरिषदेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मागील 25 वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. ती कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट प्रयत्नशील आहेत. शिवसेना आज वर्धापन दिन आहे. दोन्ही गटाकडून वेगवेगळे वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गटाचे दोन स्वतंत्र मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. राज-उद्धव ठाकरे हे मागील वाद विसरुन मुंबईमधील मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे मनसेसोबत युती जाहीर करणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या समर्थकांना संबोधित करणार आहेत. एकनाथ शिंदे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची कास धरणार की एकला चलो रे चा नारा देणार याकडे राजकीय वर्तुळामध्ये लक्ष लागले आहे. त्याचबरोबर शिंदेंचे मंत्री भरत गोगावले यांची अघोरी पूजा करताना व्हिडिओ देखील समोर आली आहे. शिंदे हे त्याबाबत देखील मत व्यक्त करण्याची शक्यता आहे.
शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश
उद्धव ठाकरे यांना वर्धापन दिनाच्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशामध्ये एक शरद पवार यांच्या गटातील माजी नगरसेवक आहेत. तसेच दोन ठाकरे गटाचे आहेत. कालच उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची भेट घेत बैठक घेतली होती. आता मात्र त्यांना धक्का बसला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्धापन दिनावरुन शिंदे गटाला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. काही हौशे-नवशे देखील त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांनी वर्धापन दिनाचे बॅनर्स लावले आहेत. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा काय संबंध आहे. त्यांनी संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरला पाहिजे,’ असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. दोन शिवसेनेच्या दोन वर्धापन दिनाच्या मेळाव्यावरुन राज्याचे राजकारण रंगताना दिसून येत आहे.