
Satara News: ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अन् अचानक आग! साताऱ्यात हजारो भाविकांमध्ये उडाला गोंधळ
राजवाडा परिसरात मोठी गर्दी
बुधवारी रात्री साताऱ्यात विविध गणेश मंडळांचे आगमन सोहळे मोठ्या उत्साहात पार पडत होते. मानाचे आझाद हिंद मंडळ, समता पार्क, नर्मदेश्वर, शिवतेज आणि सह्याद्रीचा राजा यांसह प्रमुख मंडळांच्या मिरवणुका शहरातून मार्गस्थ झाल्या होत्या. राजवाडा बस थांबा हा मिरवणुकांचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याने या परिसरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती. ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या देखाव्याची पहिली झलक पाहण्यासाठीही मोठी गर्दी जमली होती.
फटाक्यांच्या आतषबाजीनंतर आगीचा भडका
मिरवणूक सुरू असताना फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्याचवेळी गणेशमूर्तीजवळील हलत्या डायनासॉरच्या देखाव्याने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने मोठा भडका घेतल्याने उपस्थित भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. आगीची तीव्रता लक्षात येताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यांनी आग लागलेल्या ट्रॉलीपासून श्रींची मूर्ती सुरक्षित अंतरावर हलवली. तसेच जनरेटर आणि ध्वनियंत्रणाही बाजूला करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी दाखवली तत्परता
कार्यकर्त्यांनी बादल्यांमधून पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा: Pune: दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; आई-वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण
सुदैवाने जीवितहानी टळली
राजवाडा परिसरात मोठी गर्दी असतानाच ही घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ बघ्यांची गर्दी बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यकर्ते आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आणखी पसरली नाही. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.