
Swabhimani Shetkari Sanghatana, Khatav, Satara News, Sugarcane Agitation, Agribusiness,
गोपुज, वाकळवाडी, नायकाची वाडी, निमसोड, आंबवडे, हिंगणे, डाळमोडी, चितळी आणि मायणी या भागांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. ऊस परिषदेत जाहीर झालेला दर मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असून, दराचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय ऊस कारखान्याला पाठवू नये, अशी भूमिका संघटनेने मांडली.
Success Story : पॅरिसची लाखोंची ऑफर नाकारली… भारतात येऊन सुरु केला व्यवसाय आता महिन्याला
यावेळी ऊस वाहतूकदारांना केवळ समज देऊन वाहतूक थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून वाहतूक सुरू ठेवल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे यांनी दिला.
“आज आम्ही ऊस वाहतूकदारांना समज देत आहोत. मात्र, उद्या आंदोलन तीव्र झाले तर त्याची जबाबदारी संबंधित कारखाना प्रशासनाची असेल. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ऊस वाहतूक करू नका. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,” असा इशारा घार्गे यांनी दिला.
सोनहिरा, अजिंक्यतारा, शिवनेरी, वर्धन (पडळ), खटाव, जरंडेश्वर यांसह संबंधित साखर कारखान्यांच्या प्रशासनाने ऊस परिषदेत जाहीर झालेल्या दराच्या प्रश्नावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
ऊसदराचा प्रश्न सुटेपर्यंत वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कारखान्यांच्या गव्हाण बंद पाडण्यापर्यंत आंदोलन नेण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळालाच पाहिजे, या मागणीवर संघटना ठाम असून, दराबाबत तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एकीकडे शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा म्हणून संघटना रस्त्यावर उतरली असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांनीही आंदोलनाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.“स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरली आहे. मग आपल्या हक्काच्या दरासाठी दोन-चार दिवस ऊसतोड थांबली, तर त्यात बिघडणार काय? तात्पुरत्या अडचणींपेक्षा उसाला योग्य दर मिळणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवावी,” असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
हिंगणे परिसरात संतोष निकम, चितळी परिसरात अनिल कचरे, तर बनपुरी आणि येरळवाडी परिसरात युवक तालुकाध्यक्ष विजय देवकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊसदराच्या प्रश्नावर संघटनेची भूमिका समजावून सांगत ऊसतोडी थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. खटाव तालुक्यातील ऊसदराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे. खातगुण आणी येळीव, उंबर्डे गोपूज, बनपुरी मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला आहे.