Satish Khokya Bhosale wife goes on a hunger strike in beed
बीड : मागील तीन महिन्यांपासून राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. यानंतर जालनामध्ये मारहाण केल्याची व्हिडिओ समोर आली. मारहाण करणारा हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यामुळे हे प्रकरण गाजले.
राज्यभरातून यावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी अखेर सतीश उर्फ खोक्या भोसले याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून अटक केली. सध्या सतीश हा कोठडीमध्ये असून त्याच्यावर जंगली प्राण्यांची शिकार केल्याचे पुरावे घरामध्ये आढळून आले. त्याचबरोबर राज्यभरातून जोरदार रोष व्यक्त करण्यात आल्यानंतर सतीश भोसले याच्याविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच्या शिरुरमधील घरावर बुलडोझर चालवण्यात आला. यानंतर आता सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले ही उपोषणावर बसली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वन विभागाच्या जागेवर त्याने अनधिकृतपणे घर बांधले होते. त्यामुळे वनविभागाने कारवाई केली. या कारवाईनंतर रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी त्याच्या घराला आग लावली होती. या प्रकरणाच्या विरोधात सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले ही बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसली आहे. तेजू भोसले ही आमरण उपोषणासाठी बसली असून तिने वेगवेगळ्या पाच मागण्या केल्या आहेत.
काय आहेत तेजू भोसले हिच्या मागण्या?
तेजू भोसले हिने विविध मागण्या मांडल्या असून त्या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजू भोसले म्हणाली की, आमचं घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. आमची आठ घर वनविभागाने उध्वस्त केलीत आम्हाला त्याच गावात शासनाने जागा उपलब्ध करून पक्के घर बांधून द्यावे. ढाकणे परिवाराला झालेल्या मारहाणीत सतीश भोसले त्याचे तीन भाऊ व वडील यांचा काही संबंध नाही, तरीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना निर्दोष मुक्त करावे. बाल लैंगिक अत्याचार विनयभंग, मारहाण अंतर्गत जे गुन्हे दाखल आहेत त्यातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा. माझा नवरा आमचा परिवार व पारधी समाज यांच्या विरोधात खोटा अपप्रचार सुरू आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा, अशा मागण्या तेजू भोसले हिने केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपोषणावेळी तेजू भोसले हिने तिची भूमिका स्पष्ट केली आहे. ती म्हणाली की, “आमचं घर वनखात्याने उद्ध्वस्त करून टाकल आहे. आमचं पुनर्वसन करण्यात यावं. आम्हाला घरदार नाही आमचे लेकर उन्हात बसत आहेत. आमचे मालक अटक झाले पुढचे आरोपी अटक झाले पाहिजे. आमचं घर दार जाळून टाकलं आमच्या महिलांना मारहाण केली. गावगुंडे कोणते आहेत त्यांना शोधून घेतला पाहिजे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया सतीश भोसले यांच्या पत्नी तेजू भोसले यांनी दिली आहे.