मराठी भाषेवर पुन्हा अन्याय..., Zudio कर्मचाऱ्यांच्या टी-शर्टवर १२ वेगवेगळ्या भारतीय भाषांना स्थान, मात्र मराठी भाषेची उपेक्षा
भाईंदर: टाटा समूहाच्या मेसर्स ट्रेंट लिमिटेड कंपनीने २०१६ मध्ये सुरू केलेल्या झुडिओ (Zudio) या फॅशन ब्रँडची लोकप्रियता संपूर्ण देशभर पसरली आहे. महाराष्ट्रात या ब्रँडची सर्वाधिक दुकाने असूनही, कंपनीने मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. झुडिओ ब्रँडच्या जाहिरातींसाठी तयार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या टी-शर्टवर १२ वेगवेगळ्या भारतीय भाषांना स्थान देण्यात आले, मात्र मराठीला पूर्णतः वगळण्यात आले आहे. या प्रकारावर मराठी एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत कंपनीच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले असून, तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात झुडिओ ब्रँडचे शेकडो आऊटलेट्स कार्यरत आहेत. मराठी भाषिक ग्राहकांची मोठी बाजारपेठ असूनही, कंपनीच्या जाहिरात आणि प्रमोशन धोरणात मराठीला डावलण्यात आले आहे. टाटा समूहाच्या या उपकंपनीने झुडिओ रिटेल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांसाठी जाहिरात तत्त्वावर टी-शर्ट तयार केले. या टी-शर्टवर कंपनीने १२ वेगवेगळ्या भाषांमध्ये ‘झुडिओ’ हे नाव छापले आहे. त्यामध्ये हिंदी, कन्नड, बंगाली, गुजराती, पंजाबी यांसारख्या भाषांचा समावेश असला तरी मराठी भाषेला जागा नाही. हे लक्षात येताच, मराठी भाषाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्र हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर १ मे १९६० रोजी निर्माण झाले. राज्यातील प्रमुख भाषा मराठी असूनही, तिला राजभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी तब्बल ६५ वर्षे लागली. केंद्र सरकारने मराठीला अलिकडेच राजभाषेचा दर्जा दिला असला तरी, विविध खासगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्या मराठी भाषेची सातत्याने गळचेपी करत असल्याचे चित्र दिसत आहे. झुडिओच्या या प्रकारामुळे मराठी भाषिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
मराठी एकीकरण समितीने झुडिओ व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनात तात्काळ सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आणि मराठी भाषेची उपेक्षा करायची, हे खपवून घेतले जाणार नाही,” असे मराठी एकीकरण समितीचे म्हणणे आहे.
समितीचे पदाधिकारी म्हणतात, “टाटा समूहासारख्या मोठ्या उद्योग समूहाने महाराष्ट्रातील भाषिक अस्मितेचा विचार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी भाषेला महत्त्व द्यावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.”
राज्यातील अनेक व्यवसायांमध्ये मराठी भाषेची सातत्याने उपेक्षा होत आहे. खासगी कंपन्या हिंदीसह इतर भाषांना स्थान देतात, मात्र मराठीसाठी तेवढ्याच तत्परतेने निर्णय घेत नाहीत. राज्य सरकारने मराठीसाठी सक्तीचे धोरण आखले असले तरी, त्याची अंमलबजावणी होत नाही. मराठी भाषेच्या संदर्भात राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने, झुडिओसारख्या कंपन्या महाराष्ट्रात व्यवसाय करूनही मराठीला डावलण्याचे धाडस करतात, असा आरोप मराठी संघटनांनी केला आहे.
मराठी भाषिक ग्राहकांनी झुडिओच्या या मराठीविरोधी धोरणावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरही झुडिओच्या या कृतीचा निषेध केला जात आहे. “मराठीत जाहिरात करू शकत नाही, तर आमच्याकडून व्यवसाय कशासाठी?” असा संतप्त सवाल ग्राहक विचारत आहेत.
मराठी एकीकरण समितीने झुडिओ व्यवस्थापनाला दिलेल्या नोटीसनंतर आता सर्वांचे लक्ष कंपनीच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. झुडिओने आपल्या जाहिरातीत आणि टी-शर्टवर मराठी भाषेला त्वरित स्थान द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मराठी अस्मिता आणि भाषिक सन्मानासाठी, झुडिओ व्यवस्थापनाने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.