कल्याण : कल्याण पश्चिमेतील कोळवली गावातील ग्रामस्थ भगवान भंडारी यांच्या गोठ्यात सुकण्यास टाकलेल्या मासेमारीच्या जाळ्यामध्ये तब्बल पाच फूटी नाग अडकल्याचे दिसले. हे पाहून गोठामालक भयभीत झाले.
कोळवली गावातील भूमिपूत्र रहिवासी यांच्या गोठ्यात सुकण्यास टाकलेल्या मासेमारीच्या जाळ्यात नागाला अडकलेले पाहिले. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पाहून भितीने धांदल उडाली. त्यांनी सर्पमित्र हितेश करजंगावकर यांच्याशी संपर्क साधून नाग अडकल्याचे सांगितले. समयसूचकता दाखवत हितेश यांनी आपले वरिष्ठ सर्पमित्र दत्ता बोंबे यासह घटनास्थळी धाव घेत गोठ्यातील मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या पाच फुटी विषारी नागाची जाळे तोडत सुखरूप सुटका केली.
दरम्यान, नाग अडकल्याचे पाहिल्यानंतर उपस्थित भंडारी कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वनपाल राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र दत्ता बोंबे, हितेश करजंगावकर यांनी जाळ्यातून सुटका केलेल्या नागास जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडले.