shubhangi patil at shivsena bhavan
मुंबई: विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये पराभव झाला. आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituncy) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी कडवी झुंज देत 40 हजार मते मिळवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनी शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
प्रचारादरम्यान त्या म्हणाल्या होत्या की, निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत आंदोलन करणार आहे. त्यानुसार त्यांनी मुंबईत शिवसेना भवनात जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच, ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी शुभांगी पाटील यांचे कौतुकही केल्याचे त्या म्हणाल्या.
ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्या म्हणाल्या की, आज मुंबई शिवसेना भवनात जाऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तुझं खरं अभिनंदन केले पाहिजे, एवढ्या कमी कालावधीत शर्थीने निवडणूक लढवली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शुभांगी पाटील यांच्या पाठिंबा शाबासकी दिली आहे. एवढं मतदान मिळणं म्हणजे लोकांनी दिलेलं प्रेम आहे. जवळपास 12 हजार मतदान बाद झालं आणि 40 हजार मतदान मिळाले. एक सामान्य घरातल्या लेकीचा हा फार मोठा विजय आहे, जनतेचा यात विजय आहे. जनतेने हरून जाऊ नये, मी हरलेली नाही, तुम्ही हरू नका. आता खरी लढाई सुरू झाली आहे. आज अधिकृतरित्या ठाकरे गटात प्रवेश केला, असल्याचे शुभांगी पाटील म्हणाल्या.
शुभांगी पाटील पुढे म्हणाल्या की, निवडणूक निकालाच्या दिवशीच येणार होते, मात्र निकालाला उशीर झाल्याने येऊ शकली नाही. काल मुंबईत शिवसेना भवन गाठले. उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेत, आशीर्वाद घेतले. शिवबंधन बांधलं. सामान्य घरातल्या लेकीचा सामान्य जनतेला शब्द होता. त्या शब्दाला पुढे टिकवायचा आहे, म्हणून मी शब्द दिला होता. त्यामुळे आज शिवसेना भवनात येऊन उद्धव ठाकरे साहेबांचे आशीर्वाद घेतल्याचे त्या म्हणाल्या.