शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थान अॅक्शन मोडवर ; निर्णयाची अंमलबजावणी उद्याच होणार
शिर्डीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या खूनाच्या घटनांनी संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी परिसरात खळबळ उडाली होती. शिर्डी संस्थानाच्या या दोन कर्मचाऱ्यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शिर्डी संस्थानाने कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केला होता. त्यानंतर आता शिर्डी संस्थानाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शिर्डीतील साई मंदिरात दर्शन रांगेसह संस्थानाच्या भक्त निवासात मोफत भोजन कूपन दिले जाणार आहेत. यापूर्वी मोफत जेवणासाठी साई संस्थानच्या प्रसादालयात थेट प्रवेश होता.
शिर्डी मंदिरातील मोफत भोजनासाठी थेट प्रवेशामुळे शिर्डीत भिक्षेकरी आणि गुन्हेगार वाढल्याचा मुद्दा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
साई संस्थानच्या प्रसादालायातील मोफत भोजनावरून विखे पिता-पुत्रांची वेगवेगळी भूमिका घेतली आहे. मंदिरातील मोफत भोजन बंद करून साईभक्तांकडून शुल्क आकारा, असं सुजय विखे पाटील यांचं म्हणणं आहे. तर साईभक्तांना प्रसाद भोजन नि:शुल्क सुरुच राहील, असं राधाकृष्ण विखे पाटील यांचं म्हणणं आहे.
पुत्राच्या वेगळ्या भूमिकेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर असल्याचं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते.