'उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केलं तर माझं नाव...' या बड्या नेत्याने घेतली शपथ?
उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव सांगणार नाही अशी शपथ शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी घेतली आहे. ठाकरे यांच्या विरोधात रामदास कदम हे नेहमीच आक्रमक वक्तव्य करत आले आहेत. आपल्या मुलाला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा डाव उद्धव ठाकरेंचा होता. पण आता आपणच त्यांना उद्ध्वस्त करु असं कदम म्हणाले आहे. दापोलीतील शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते.
दापोलीत शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर फत्ते झाले आहे. ठाकरे गटाच्या जवळपास 9 नगरसवेकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यात उपनगराध्यक्ष आणि 8 नगरसेवकांचा समावेश आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोलीत हा प्रवेश झाला.
यावेळी रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. आपल्याच आमदाराला संपवण्याचा नीच विचार उद्धव ठाकरेंच्या मनात येऊ शकतो. जगाच्या पाठवीवर असा विचार करणारा पक्षप्रमुख नाही असा आरोपही कदम यांनी केला. आम्हाला उठाव नाईलाजाने करावा लागला. उध्दव ठाकरे माझ्या मुलाच्या मुळावर उठले होते. ज्या पद्धतीने त्याला संपविण्याचा प्रयत्न केला, म्हणून उठाव करण्याचा निर्णय घेतला असंही ते म्हणाले.
आता या महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केलं नाही तर माझं नाव रामदास कदम नाही अशी शपथ ही त्यांनी यावेळी घेतली. उध्दव ठाकरेंना महाराष्ट्रातून संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही ते म्हणाले. रामदास कदम यांनी या आधी ही उद्धव ठाकरेंवर अशाच पद्धतीची टीका केली आहे. आपल्याला राजकारणातून उठवण्याचा डाव होता हा कदम यांचा सततचा आरोप आहे. शिवाय आदित्य ठाकरे हे माझ्या पर्यावरण मंत्र्याच्या खुर्चीवर बसले असं ही कदम नेहमी सांगत असतात.