वाहतूक कोंडीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संतापले
Dombivli News in Marathi : कल्याण डोंबिवलीला रस्ते मार्गाने जोडणारा कल्याण – शिळ फाटा हा मार्ग महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे गेल्या दोन अडीच वर्षांपासून सहा पदरीकरण व सिमेंट कॉंक्रीटिकरण करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर वाढलेली वाहने व त्यातच सुररू असलेल्या कामांमुळे वाहतुकीची प्रचंड प्रमाणात कोंडी होत आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक तसेच आजूबाजूचे नागरिक कमालीचे हैराण झाले असून कल्याण शिळ मार्गाने प्रवास नको रे बाबा म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
याचदरम्यान आता “डोंबिवलीचे लोक खूप सहनशील झाले आहे. बाकीच्या शहरांप्रमाणे कोणत्याही समस्येबाबत उद्रेक होत नाही. त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. लोकांनी शिवसेना ठाकरे पक्षासोबत राहून रस्त्यावर उतरावे तर नियोजन शून्य झालेल्या ट्रॅफिकची समस्या सुटणार”, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण शीळ रस्त्यावर होत असलेल्या ट्रॅफिकमुळे नागरीक त्रस्त आहे. भर उन्हात वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरीकांना लोकांचे हाल होत आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागतं. कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी काम करण्यात आले. हे काम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी २० टक्के काम भूसंपादनाचा मोबदला दिला गेला नसल्याने रखडलेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही. त्यात पलावा उड्डाण पूलाच्या कामाची रखडपट्टी सुरु आहे. याशिवाय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ते रुनवाल गार्डन दरम्यान कल्याण शीळ रस्त्यावर कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
कल्याण शीळ रस्त्याच्या आड येणारी बेकायदा बांधकाम हटविण्यासाठी गेल्या १० वर्षात वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेने कल्याण डोंबिवली महापालिकेकडे कोणताही पाठपुरावा केला नाही अशी कबूलीच वाहतूक शाखेने दिली आहे. या वाहतूक कोंडीचा परिमाण शहरातील वाहतूकीवर होत आहे. डोंबिवली पूर्वेतून पश्चिमेला जाण्याकरीता वाहतूक कोंडीमुळे विलंब होत आहे. अनेकांना भर उन्हात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या वेळी मुख्यमंत्री आणि केडीएमसी आयुक्तांना मागणी केली आहे. १९९९ नंतर केडीएमसीत नोकर भरती केली जाणार आहे. केडीएमसी नोकर भरतीत भूमीपूत्रांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे.
तसेच कल्याण शीळ फाटा या रस्त्याने दररोज प्रवास करण्याची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या मार्गावर सकाळ – संध्याकाळ या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने अनेक कामगारांना लेट मार्क लागतो. अर्ध्यावरून घरी परतण्याचा मार्ग अवलंबला तरी वाहतूक कोंडीतून बाहेर पडणे अशक्य असते. अर्ध्या – एक तासाच्या प्रवासाला अडीच ते चार तास लागत असल्याचे चित्र आहे. सलग सार्वजनिक सुट्ट्या असतील तेव्हा मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेरगावी जात असतात. त्यादिवशी सकाळपासून या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी वाहने एकाच ठिकाणी तासंतास अडकून राहतात. त्यामुळे कल्याण शिळ रोडने प्रवास नको रे बाबा म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.