संग्रहित फोटो
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या, इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड शहर व जिल्हयाचा निकाल हा 94.87 टक्के इतका लागला आहे. राज्याप्रमाणे पुणे जिल्हयातही बारावीच्या परीक्षेत मुलीच अव्वल ठरल्या असून, त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 96.32 टक्के इतकी आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 93.74 टक्के इतकी आहे.
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात नेहमीच उत्तीर्णेतेचे प्रमाण दरवर्षीप्रमाण् 90 टक्क्यांच्या पुढेच राहिले आहे. गतवर्षी पुणे जिल्हयाचा एकूण निकाल 95.19 टक्के इतका होता, तो यावर्षी किंचितसा कमी होऊन 94.87 टक्के इतका झाला आहे.
पुणे जिल्हयातून एकूण 1 लाख 27 हजार 964 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. यापैकी 1 लाख 27 हजार 387 जणंनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये 61 हजार 916 मुले व 58 हजार 938 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यात गैरप्रकारात घट झाली असून, यंदा केवळ 10 ठिकाणी कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत. तर पुणे विभागात म्हणजेच पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या तीन जिल्हयात मिळून एकूण् 66 गैरप्रकार किंबहुना कॉपीचे करण्याचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक गैरप्रकार सोलापूर येथे 36 तर अहिल्यानगर येथे 20 गैरप्रकार आढळून आले आहे.
पुणे विभागाचा निकाल 91.32 टक्के
पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या पुणे विभागाचा एकूण निकाल 91.32 टक्के इतका लागला आहे. पुणे विभागातून एकूण 2 लाख 21 हजार 631 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यात अहिल्यानगर जिल्हयाचा निकाल 86.34 टक्के तर सोलापूर जिल्हयाचा निकाल 88.62 टक्के लागला आहे.