पंढरपुराती मंदिर समितीचे कर्मचारी काम बंद आंदोलनावर
पंढरपूर : राज्यभरामध्ये आषाढी वारीचा उत्साह आहे. लाखो वारकऱ्यांसह राज्यभरातून पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. थोड्याच दिवसांमध्ये पंढरपुरामध्ये लाखो वैष्णवांचा मेळा जमणार आहे. मात्र त्यापूर्वी पंढरपूर मंदिर समितीमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. कर्मचाऱ्यांबाबत एका रहिवाशाने अपशब्द वापरल्याविरोधात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे पंढरपुरामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर हे काल श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत होते. मात्र यावेळी शशिकांत पाटील या पंढरपुरच्या रहिवासी असलेल्या या इसमाने त्यांना अपशब्द वापरले. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरु केले आहे.
मंदिर समितीच्या लोकांना शिवीगाळ केली जाऊ नये आणि या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मंदिर समितीने आंदोलन सुरु केले आहे. तसेच ज्या व्यक्तीने अनंता रोपळकर यांना शिवीगाळ केली आहे त्या व्यक्तीने माफी मागावी व प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी कर्माचाऱ्यांनी केली आहे. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुराच्या दिशेने निघाले आहेत. आषाढी वारीचा सर्वत्र उत्साह आहे. पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी सर्व भाविक आतूर झाले आहेत. मात्र मंदिर समितीने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.