
फोटो सौजन्य - Social Media
सिमेन्स लिमिटेडला पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या विस्तारासाठी टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेडकडून महत्त्वाची ऑर्डर मिळाली आहे. या कराराअंतर्गत कंपनी 12 ट्रेनसेटसाठी अत्याधुनिक प्रोपल्शन सिस्टिम आणि ट्रेन कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टिम (TCMS) पुरवणार आहे. या कामामध्ये ट्रॅक्शन कन्व्हर्टर, ऑक्झिलरी कन्व्हर्टर, ट्रॅक्शन मोटर्स आणि TCMS यांची रचना, उत्पादन, पुरवठा आणि वॉरंटीचा समावेश आहे.
सिमेन्स लिमिटेडच्या मोबिलिटी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जोइसर यांनी सांगितले की, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी टिटागढ रेल सिस्टिम्ससोबत भागीदारी करताना कंपनीला आनंद होत आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या मेट्रो क्षेत्रासाठी अत्याधुनिक प्रोपल्शन आणि TCMS तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, शाश्वत शहरी वाहतुकीवर भारत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असताना स्थानिक उत्पादन आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करणे गरजेचे आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत राहून भारतातील सिमेन्सच्या उत्पादन व अभियांत्रिकी क्षमतेचा वापर करून ही प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी यांनी सांगितले की, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सिमेन्ससोबतची ही भागीदारी स्वदेशी प्रोपल्शन प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाची ठरेल. जवळपास संपूर्ण स्थानिकीकरणावर भर देत ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळकटी देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी पुढे सांगितले की, पुणे मेट्रो हा टिटागढसाठी विशेष प्रकल्प आहे, कारण याच माध्यमातून कंपनीने प्रवासी रेल्वे क्षेत्रात प्रवेश केला आणि भारतातील पहिल्या अॅल्युमिनियम बॉडी असलेल्या मेट्रो डब्यांची निर्मिती केली. नव्या करारामुळे देशातील अॅल्युमिनियम ट्रेन परिसंस्थेला आणखी चालना मिळेल आणि शहरी वाहतुकीसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासालाही गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.