श्रावणात मासांहार सोडल्याने आता कोळंबीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारळी पौर्णिमेनंतर समुद्रात मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव सुरुवात करतात. पावसामुळे खोल समुद्रात जाण्यास बंदी असलेले कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करुन मासेमारीला सुरुवात करतात. याच नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आता कोळंबी माश्याचे दर गडगडले असल्याचं दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारी हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोळंबी माशाचा बंपर कॅच मच्छिमारांना मिळत आहे. वेंगुर्ला समुद्रात मच्छिमारांच्या जाळीत रोजच कोळंबी मासा सापडत आहे. हंगामाच्या सुरुवातीला महागडी कोळंबी व मोरी मासा सापडत असल्यामुळे मच्छीमार आनंदीत झाला आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे या कोळंबीला दर कमी आहे. एरवी ३०० ते ४०० रूपये किलोला विकली जाणारी कोळंबी सध्या १५० ते २०० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे मासे प्रेमींची चंगळ झाली आहे.