Ladki Bahin
ठाणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत महिलांना दर महिना दीड हजार रूपये आर्थिक मदत दिली जात आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिवाय अर्ज करण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती. अनेक नियमही शिथिल करण्यात आले होते.
अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यात अडचणी येत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 12 लाख 85 हजार 258 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. तर १२ लाख ३९ हजार ९६, महिलांचे अर्ज मंजूर झाले असल्याने तब्बल ४६ हजार १६२ लाडक्या बहिणींचे अर्ज नामंजूर झाले असल्याचे उघडकीस आले आहे.
ग्रामीणमध्ये नोंदणीचे प्रमाण कमी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अर्जाचे छाननीसाठी सुधारित अॅप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यातही ग्रामीण मुरबाड तालुक्यात अवधी ५४ हजार ३०६ महिलांनी अर्ज केले आहेत. याच प्रमाणे शहापूर ७९ हजार ६९१, उल्हासनगर ८४ हजार ६०१ आणि अंबरनाथ तालुक्यात ९७ हजार ५५ महिलांनी अर्ज केले आहेत.
परराज्यातील महिलेला पतीच्या कागदपत्रांवर मिळणार लाभ
दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर लग्न केल्यास पतीच्या कागदपत्रावर तिला लाभ मिळेल. गावात समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार, त्यात बदलही केले जाणार आहेत. केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही यापुढे लाभ मिळणार आहे. नवविवाहित महिलेची नोंदणी शक्य नसेल, तर पतीचे रेशनिंग कार्ड ग्राह्य धरणार आहे. अशा अटी शिथिल केल्या असतानाही जिल्ह्यात ४६ हजार १६२ महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.