सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात समाविष्ट करावे; धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी
अकलूज : सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात समाविष्ट करावे, अशी मागणी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली आहे. सरकारने भारतात उत्पादित विविध कृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी क्षेत्रीय विकास कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
हेदेखील वाचा : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पीकस्पर्धा रब्बी हंगाम २०२४ चे आयोजन; ३१ डिसेंबरपर्यंत करु शकतात अर्ज
कृषी उत्पादन निर्यातासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्धतेसाठी अपेडा (APEDA) संस्थेमार्फत कृषी निर्यात कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे. देशातील 20 राज्यांमधील 230 जिल्ह्यांमध्ये 60 कृषी उत्पादनांच्या निर्यात क्षेत्रांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील यात जळगाव, धुळे, नंदुरबार, वर्धा, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांना केळी निर्यात क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. हे लक्षात घेता, सोलापूर जिल्ह्यात सध्या केळी लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
सुमारे 19 हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. केळी निर्यातीच्या दृष्टीने विचार करता, देशातील एकूण केळी निर्यातीपैकी 63 टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते. यातील सुमारे 58 टक्के निर्यात केवळ सोलापूर जिल्ह्यातून होते.
11 लाखांहून अधिक मेट्रिक टन केली निर्यात
मागील वर्षी महाराष्ट्रातून सुमारे ११ लाख २३ हजार ५२४ मेट्रिक टन केळी निर्यात झाली. यापैकी सुमारे ६ लाख ४८ हजार २६२ मेट्रिक टन केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राज्यातून सुमारे २५ हजार कंटेनर केळी निर्यात झाली असून, यातील १६ हजार कंटेनर सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाले आहेत. ही बाब खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्री वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यानुसार, आता सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात समाविष्ट करावे म्हणून निवेदन देऊन मागणी केली.
जिल्ह्यातील केळीचे विक्रमी उत्पादन
जिल्ह्यातील केळीचे विक्रमी उत्पादन व निर्यात लक्षात घेता सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात समाविष्ट करावे, ज्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या केळींच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत निर्यात संधी प्राप्त होतील. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील प्रयत्नशील असून, याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
हेदेखील वाचा : पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदे अद्याप रिक्तच; सत्ता स्थापनेनंतर दोन पदे वाढण्याची शक्यता