पुणे महानगरपालिका (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाची तीन पदे मंजुर आहेत. मात्र, गेल्या नऊ महिन्यापासून यातील दोन पदे रिक्त असल्याने प्रशासनाचे काम कोलमडले आहे. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना एका अतिरिक्त आयुक्ताकडच्या खात्यांचा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उठली असली तरीही राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या संभाव्य बदल्यांमध्ये पुणे मनपाला दोन अतिरिक्त आयुक्त मिळण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद महत्त्वाचे असून, येथे काम करण्यासाठी अनेक आयएएस अधिकारी मंत्रालयातून तसेच राजकीय नेत्याकडे जाऊन वशिला लावत असतात. येथील जागी रिक्त झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती, पण कोणाचीही नियुक्ती झाली नाही. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा कोणत्या पक्षाची सत्ता येईल याची खात्री नव्हती. त्यामुळे वशिल्याच्या अधिकाऱ्यांनी नवीन सरकार आल्यास त्यांचा त्रास नको म्हणून पुणे महापालिकेत बदली न करून घेण्यास नापसंती दर्शविली.
आता विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महायुतीची सत्ताही कायम राहिली आहे. नवीन सरकारचा शपथविधी उरकल्यानंतर नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. त्यामध्ये पुणे महापालिकेत कोणाची वर्णी लागणार हे पाहावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उठली असली तरीही राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त दिलेले नाहीत. पुणे महापालिकेत सुमारे ५२ विभाग, १५ क्षेत्रीय कार्यालय, पाच परिमंडळ कार्यालय, सुमारे १७ हजार कर्मचारी असा मोठा पसारा आहे. येथील कामाचा ताण जास्त असल्याने आयुक्तांसह तीन अतिरिक्त आयुक्त पद निर्माण केले आहेत. त्यातील एका जागेवर महापालिकेच्या सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची बढतीने नियुक्ती होते. जर शासनाला या पदासाठी योग्य व्यक्ती न मिळाल्यास तेथे आयएएस दर्जाचाही अधिकारी नियुक्त करता येतो.
दोघांवर कामांचा ताण
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताना महापालिकेतील रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या झाल्या. तर पृथ्वीराज बी. पी. यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. गेल्या नऊ महिन्यांपासून दोन जागा रिक्त असल्याने आयुक्त भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. या दोघांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे.
चार ते पाच विभागांची जबाबदारी आयुक्तांकडे
पथ, भूसंपादन, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन, पाच पैकी तीन परिमंडळ यासह अन्य विभागांची जबाबदारी थेट आयुक्तांकडे आली आहे. आयुक्तांच्या सवडीनुसार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना विविध विकास कामांवर चर्चा, निर्णय करावे लागत आहेत.तर पृथ्वीराज बी. पी. यांनाही दैनंदिन कामाचा मोठा ताण निर्माण होत असल्याने नवीन काम सुचविणे, प्रकल्प आणणे यावर काम करण्यासाठी वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे.दरम्यान, आयुक्त भोसले यांनी अतिरिक्त आयुक्त पदाच्या जागेवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले.