फोटो सौजन्य- iStock
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. विविध भागातील शेतकरी हे पिकांची उत्पादकतेत वाढ करण्यासाठी विविध प्रयोग करतो. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबद्दल प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तसेच यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
ही पिकस्पर्धा मागील वर्षीप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
पीकस्पर्धेसंबंधी महत्वाची माहिती
तालुका पातळी : पहिले बक्षिस ५ हजार रुपये, दुसरे बक्षिस ३ हजार रुपये, तिसरे बक्षिस २ हजार रुपये.
जिल्हा पातळी : पहिले बक्षिस १० हजार रुपये, दुसरे बक्षिस ७ हजार रुपये, तिसरे बक्षिस ५ हजार रुपये
राज्य पातळी : पहिले बक्षिस ५० हजार रुपये, दुसरे बक्षिस ४० हजार रुपये, तिसरे बक्षिस ३० हजार रुपये
नमुद पिकांच्या क्षेत्रामध्ये आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.