
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा आणि मघा या नक्षत्रांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. काही भागांत रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला असला, तरी त्याचा शेतीला फारसा फायदा झालेला नाही. परिणामी सोयाबीन, उडीद, मूग, मका आणि तूर यासह विविध खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, काही पिके करपण्याच्या स्थितीत आहेत.
३० ऑगस्टपासून पूर्वा नक्षत्राला सुरुवात झाली असून, आता शेतकऱ्यांचे लक्ष उत्तरा आणि हस्त नक्षत्राकडे लागले आहे. या काळात दमदार पाऊस झाला तरच रब्बी हंगामाच्या पेरणीला चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीतही घट होत असून, काही भागांत बोअरवेल बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे खरीप पिकांसोबतच आगामी रब्बी हंगामाचेही संकट अधिक गडद होताना दिसत आहे.
पावसाळ्यातील महत्त्वाची नक्षत्रे कोरडी गेल्याने जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. खरीप पिकांना पाण्याची गरज असताना पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आता उत्तरा आणि हस्त नक्षत्रात तरी दमदार पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीही हा पाऊस महत्त्वाचा ठरणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.