
जामखेडचा राजकीय पॅटर्नच वेगळा!
या विजयोत्सवातून राजकीय संघटनात्मक बांधिलकी, सामाजिक सलोखा आणि विकासाचा ठाम संकल्प स्पष्टपणे दिसून आला. जामखेड नगरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, भाजपचे १५ नवनिर्वाचित नगरसेवक तसेच निवडणुकीत पराभूत झालेले ९ उमेदवार यांचा संयुक्त सन्मान सोहळा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
ठाकरे बंधू एकत्र येण्याने मुंबईत कोणताही परिणाम होणार नाही! मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे वक्तव्य
विजयी नगराध्यक्षा आणि नगरसेवकांना फेटा बांधून व पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले, तर पराभूत उमेदवारांना मायेची शाल देत सन्मानित करण्यात आले. “राजकारणात पराभव हा शेवट नसून पुढील संघर्षाची सुरुवात असते,” असा सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
या वेळी बोलताना प्रा. राम शिंदे यांनी निवडणूक काळात अहोरात्र मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. “पंधरा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत प्रभागांमध्ये काम केले, पण ना वाहन मागितले, ना जेवण, ना खर्च. हीच खरी संघटनाची ताकद आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांची पाठ थोपटली.
तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रिंगरोड यांसारख्या विकासकामांद्वारे जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी सत्काराला उत्तर देताना अभ्यासपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि विकासकेंद्री भाषण केले. सकारात्मक विचारसरणी, स्पष्ट भूमिका आणि नियोजनबद्ध दृष्टीकोनामुळे उपस्थित श्रोते प्रभावित झाले. निवडणूक प्रचारातील त्यांच्या कॉर्नर सभांप्रमाणेच हे भाषणही विशेष लक्षवेधी ठरले.
यावेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. राम शिंदे यांच्या झालेल्या पराभवाची खंत व्यक्त करत, नगरपरिषद निवडणुकीत जनतेने त्याला योग्य उत्तर दिले, अशी प्रतिक्रिया नेतेमंडळींनी व्यक्त केली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला.