मुंबई- पगार आणि विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाला बसलेले एसटी कर्मचारी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. महामंडळ सरकारमध्ये विलिन करुन घ्यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. आज दादरच्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी त्यांची भेट घेणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपा आणि मनसेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन आता राजकीय वळणार गेल्याचे मानण्यात येते आहे.
राज्यातील डेपोंमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही कायम आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. जोपर्यंत या प्रश्नाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत झाद मैदान न सोडण्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. पगार वेळेवर नसल्याने आत्तापर्यंत ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पगार वेळेवर व्हावेत आणि महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी महामंडळ सरकारमध्ये विलिन करुन घ्यावे ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र तरीही कर्मचारी दोलनावर ठाम आहेत. विलिनीकरणाची प्रक्रिया लगेच होणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही स्पष्ट केले आहे. सरकारने आत्तापर्यंत सुमारे ५०० संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून, महामंडळ येत्या काळात काही जणांना बडतर्फ करण्याचीही शक्यता आहे.
मुंबई हायकोर्टातही सरकारच्या वतीने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. संप करु नये, असे हायकोर्टाचे आदेश असतानाही कर्मचाऱ्यांनी संपर सुरुच ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही बाजू या आपआपल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे तातडीने यावर काही निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याने, यावर लगेच तोडगा निघणे अशक्य दिसते आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या निमित्ताने भाजपा आणि मनसे यांच्याकडून सरकारच्या अडचणी वाढवण्यात येत आहेत. आझाद मैदानातील आंदोलनात भआजपा नेते सहभागी झालेले पाहायला मिळाले. सदाभआऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या मुद्द्यावर सातत्याने सरकारवर टीका करती आहेत. एसटीच्या टॅक्सचे पैसे हे मातोश्रीवर जातात, असा खळबळजनक आरो काल भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तर मनसेही या आंदोलनात उतरली असून, आज राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
दिवाळीत गावी गेलेल्या अनेक जणांना या संपाचा फटका बसला आहे. अजूनही राज्यात अनेक ठिकाणी खासगी वाहतूकरांकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. शंभर, दोनशे भाड्याऐवजी सातशे ते आठशे रुपये प्रवासासाठी मोजावे लागत आहेत. तातडीने या प्रश्नावर निकाल लागावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे.