नाशिक: नाशिक जिल्ह्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik)उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी स्वत: नाराज असल्याचे सांगितले होते. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकऱणी बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे. आता यावर सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाने पक्षातून हकालपट्टी कैवल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षामध्ये नाराज असल्यावर ती नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असल्यास तो मी केला आहे. त्या गुन्ह्याच्या शिक्षेचे रूपांतर हकालपट्टीमध्ये झाले तर त्यावर मी काय उत्तर देणार? मी पक्षाविरुद्ध कोणतेही वक्तव्य केलेले संघटनात्मक बदल झाले त्यावर मी भाष्य केले. नाराजी व्यक्त करणे याची शिक्षा गुन्हा असेल तर मी केला आहे.”
काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी स्वत: नाराज असल्याचे सांगितले होतेच, पण त्याचवेळी आपल्यासह महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह आणखी १०-१२ जणही नाराज असल्याचा दावा केला होता. त्यातच बडगुजर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याने त्यांच्याविरोधात पक्षातूनही जाहीर नाराजी व्यक्त केली जात होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच बडगुजर यांच्या हकालपट्टीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. वीस वर्षांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असताना बडगुजर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ठेकेदारीतून सुरुवात करून महापालिकेतील प्रमुख पदांपर्यंत मजल मारली.
शिवसेनेचे तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्याशी त्यांनी जवळीक साधून पतसंस्था स्थापन करत निष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. या काळात बडगुजर यांनी महापालिकेतील व्यवहार समजून घेतले आणि २००७ साली सिडको प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय वाढ सुरू ठेवली.
२०१९ मध्ये बडगुजर यांची नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र शिवसेनेत फूट पडल्यावर स्थानिक पातळीवर बडगुजर यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले, यामागे बडगुजर यांचा अप्रत्यक्ष हात असल्याचा अनेकदा आरोप करण्यात आला.