सांगली : मराठा आरक्षण मिळावे यासाठी शिराळा तहसीलदारांच्या दालनात युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनाची पळापळ झाली.
मंगळवार दिनांक ३१ रोजी सकाळी नऊ वाजता देवेंद्र वसंत धस (वय ३७) बिळाशी (ता.शिराळा ) हा युवक तहसील कार्यालयात आला. सकाळची वेळ असल्याने कार्यालयात शांतता होती. याच वेळी देवेंद्र हा डिझेलचा कॅन घेऊन तहसीलदार शामला खोत-पाटील यांच्या दालनात शिरला व आतून कडी लावून घेतली.
देवेंद्र हा तहसील कार्यालयात आत्मदहनासाठी जाणार असल्याची माहिती शिराळा येथील काही युवकांना होती. ते युवक ही देवेंद्र याच्या पाठोपाठ तहसील कार्यालयात आले. परंतु देवेंद्र यांनी खोलीचे दरवाजे आतून बंद केले होते. यावेळी जमलेल्या युवकांनी देवेंद्र धस यांना आपण शिराळा तालुक्याच्या वतीने प्रशासनाला निवेदन देणारं आहोत. तुम्ही कोणताही असला निर्णय घेऊ नका. म्हणून समजून सांगत होते. परंतु देवेंद्र हे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ दखल घेत तहसीलदार शामला खोत-पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, नायब तहसीलदार हसन मुलाणी यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी वर्गाने धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी देवेंद्र याची समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला.
यावेळी देवेंद्र धस म्हणाले, महाराष्ट्रातील आमदार, खासदार यांच्या कुटुंबीयांचे कुणबी दाखले आहेत. त्यांनी ते पैशाच्या जोरावर मिळवले आहेत. परंतु आमच्या सारख्या गोरगरिबांनी कुठून पैसे आणावेत आणि आम्ही किती दिवस शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहावे. सरकारने त्वरित मराठा आरक्षण जाहीर करावे.
मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र धस हे सध्या तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. यावेळी अजय जाधव, विनोद कदम, सत्यजित कदम आदी युवक उपस्थित होते.