Sumit became a youth icon for rural youth! Sumit from Shirpur became the 356th IPS officer in the country
वणी : लोकसेवा आयोगाच्या आज लागलेल्या निकालात ३५६ वी रँक मिळवणारा शिरपूरचा सुमित सुधाकर रामटेके (Sumit Ramteke) हा आय.पी.एस झाला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुले देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात हे त्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे ‘सुमित’ (Sumit)ग्रामीण तरूणांसाठी ‘युथ आयकॉन’ ठरला आहे.
सुमितचे वडील शिरपूर येथील गुरुदेव विद्यालात परिचारक म्हणून कामाला होते. बालपणापासून हुशार असलेल्या ‘सुमित’ ने शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण केले. त्याने पुढील शिक्षणाकरिता वणी गाठली व जनता विद्यालात प्रवेश घेतला. बारावी नंतर त्याने आयआयटी वाराणसी येथून बीटेक. ची पदवी प्राप्त केली. सुमितने यापूर्वी दोन वेळा लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा दिलेली आहे. दुसऱ्यांदा दिलेल्या परीक्षेत त्याने अनुसूचित जाती या प्रवर्गातून ७४८ रँक प्राप्त केली होती. दिल्लीत डायरेक्टर इन इंडियन कॉर्पोरेट लॉ येथे तो रुजू झाला होता. मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने त्याने पुन्हा UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश प्राप्त केले आहे.
‘सुमित’ ला लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत ३५६ वी रँक मिळाली आहे. त्याला IPS करिता महाराष्ट्र कॅडर मिळाले आहे. त्याच्या यशात आई ज्योत्स्ना व वडील सुधाकर रामटेके यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यातच त्याने घेतलेले अपार कष्ट, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे फळ असून ग्रामीण भागातील तरुणांसाठी ‘सुमित’ ‘आयकॉन’ ठरला आहे. सुमितच्या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.