election results decisions will definitely be considered winds of change are starting from kasba result sharad pawar nrvb
मुंबई– कोकणात (Kokan) कोणताही प्रकल्प येत असतील, त्याने त्या भागाला जर फायदा होत असेल, तर त्या प्रकल्पाला पाठिंबा आहे. मात्र याबाबत स्थानिकांशी संवाद गरजेचा आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीतील (MVA) शिवसेना आणि काँग्रेसनं (Shivsena and congress) या प्रकल्पाला विरोध केला असताना, शरद पवार यांनी मात्र स्थानिकांशी चर्चा केली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवारांची नाट्य परिषेदच्या कामासाठी भेट घेतली. त्यावेळी उद्योगमंत्र्यांशी पवारांनी या विषयावर चर्चा केली. स्थानिकांचा विरोध असेल तर आंदोलकांशी सरकारनं चर्चा करायला हवी, अशी सूचना पवारांनी सामंत यांना केली आहे. त्याप्रमाणे गुरुवारी बारसूत प्रशासन आणि आंदोलकांत एकत्र बैठक होणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिल्याचं पवार म्हणाले आहेत. स्थानिकांशी चर्चा करुनच प्रकल्पाचा पुढचा मार्ग सुकर करायला हवं, असं पवार म्हणालेत.
बारसूतील बैठक अयशस्वी ठरली तर सर्वपक्षीय बैठक
बारसूत गुरुवारी होणाऱ्या बैठकीतही आंदोलकांचा पवित्रा विरोधाचा असेल, तर यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार करण्याची आणि विरोध कसा मावळेल, यासाठी विचार करण्याची गरजही पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे काही नेते बारसूत जाणार असून ते आंदोलनकर्त्यांची भूमिका समजावून घेतील, असं पवारांनी सांगितलंय.
बारसूवरुन मविआत मतभिन्नता ?
बारसूत उभ्या राहणाऱ्या रिफायनरीला दिलेली जागा ही उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देण्यात आली. मात्र तरीही स्थानिकांच्या आंदोलनाला ठाकरे गटानं पाठिंबा दिलेला आहे. बारसूत स्थानिकांचा विरोध थोपवण्यासाठी सरकार त्या ठिकाणी जालियनवालासारखं हत्याकांड घडवेल, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. स्थानिक ठिकाणीही ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे प्रकल्पाच्या बाजूने आहेत. तर खासदार विनायक राऊत यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसची रिफायनरीच्या विरोधी भूमिका असताना शरद पवार यांनी मात्र प्रकल्पाला पाठिंबा, मात्र स्थानिकांची चर्चा करा, त्यांना विश्वासात घ्या, असा सल्ला दिल्यानं या मुद्द्यावरुन मविआत मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय.