sushant singh rajput father k k singh reaction on Disha Salian Case
मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियान हिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यामध्ये दिशा हिने आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला असून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे देखील नाव घेतले जाते. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरण जोरदार चर्चिले जाते आहे. दिशा सालियान ही अभिनेता सुशांत सिंग रजपूत हिची सेक्रेटरी होती. आता सुशांत सिंग रजपूत याच्या वडिलांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. दिशा सालियान हिचा मृत्यू हा घातपात की आत्महत्या असे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच अभिनेता सुशांत सिंग रजपूत याने देखील आत्महत्या केली आहे. त्याच्या मृत्यू प्रकरणाबाबत देखील संशय व्यक्त करण्यात येतो. दिशा सालियान प्रकरणावर के के सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता सुशांत सिंग रजपूत याचे वडील केके सिंग यांनी दिशा सालियान हिच्या बलात्कार आणि हत्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आधी दिशा सालियानच्या वडिलांनी म्हटलं होतं की, त्यांना काहीही माहिती नाही, ही आत्महत्या असू शकते. नंतर त्यांनी काय संशोधन केलं आणि कोणत्या आधारावर म्हणत आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे, हे मला माहिती नाही. पण त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. जे काही घडलं ते हत्या की आत्महत्या होती हे तरी किमान स्पष्ट होईल आणि सुशांतच्या प्रकरणात काय घडले हे देखील समोर येईल,” असे स्पष्ट मत के के सिंग यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या हत्येच्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांची देखील नावे घेतली जातात. याबाबत पुढे ते म्हणाले की, “आता सरकार बदलले आहे, पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार यात खूप फरक आहे त्यामुळे अशी आशा आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप आशा आहे की त्यांच्या पातळीवर जे करतील ते बरोबर करतील. हे सर्व आधी व्हायला हवं होतं, मात्र तेव्हा त्यांचे सरकार नव्हते. आता हे प्रकरण पुन्हा समोर आल्याने सरकार नक्कीच लक्ष देईल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, जेणेकरून ही आत्महत्या होती की हत्या हे कळू शकेल, अशी अपेक्षा आहे. तपास झाल्यास खरं काय ते समोर येईल.” असा विश्वास केके सिंग यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आदित्य ठाकरे यांची चौकशी केली पाहिजे का असा सवाल त्यांना माध्यमांनी विचारला. तेव्हा ते म्हणाले की, “त्यांचे नाव संशयाने का घेतले जात आहे हे मला माहीत नाही. पण तपास झाल्यास नेमकं प्रकरण काय ते स्पष्ट होईल. यात कोणाचा सहभाग होता की नाही हे मी सांगू शकत नाही.” असे मत सुशांत सिंग रजपूत याच्या वडिलांनी के के सिंग यांनी व्यक्त केले आहे.