
शेतकऱ्यांच्या दूध बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; 7 दिवसांत थकीत रक्कम न दिल्यास...
कराड : कराड तालुक्यातील शेवाळेवाडी (म्हसोली) परिसरातील दूध उत्पादक शेतकरी व दूध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची बिले शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील हुतात्मा दूध संकलन केंद्राकडून जवळपास वर्षभरापासून थकवण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर तीव्र आर्थिक संकट उभे राहिले आहे. या गंभीर प्रकाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, थकीत दूध बिले तात्काळ मिळावीत, या मागणीसाठी संघटनेने जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सातारा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, एका दूध उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल १ लाख ४० हजार ७०३ रुपये थकीत असून, अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रक्कम अडवून ठेवण्यात आली आहे. यामुळे दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेले शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुधाच्या बिलावरच जनावरांचा चारा, घरखर्च तसेच मुलांचे शिक्षण अवलंबून असताना, संबंधित दूध संस्था केवळ उडवा-उडवीची उत्तरे देत शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
हेदेखील वाचा : ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा, अन्यथा…; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा
याशिवाय, दूध संकलन केंद्राने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनधारकांनाही अद्याप पैसे मिळाले नसल्याने त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने दूध पुरवठा बंद केल्याचेही समोर आले आहे.
7 दिवसांच्या आत थकीत दूध बिलांची रक्कम अदा करावी
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रशासकीय अधिकाराचा वापर करून संबंधित दूध संस्थेला ७ दिवसांच्या आत सर्व थकीत दूध बिलांची रक्कम अदा करण्याचे आदेश द्यावेत. दूध संस्थेच्या अनियमित, शेतकरीविरोधी कारभाराबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा तसेच दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी.
दूध संकलन केंद्राला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडले
प्रमोदसिंह जगदाळे यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर ७ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या दुधाचे संपूर्ण पैसे अदा करण्यात आले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेवाळेवाडी परिसरातील दूध संकलन केंद्राला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.